Helicopter Crash: काठमांडूहून नेपाळच्या खोटांग जिल्ह्याकडे निघालेल्या 'एअर डायनेस्टी'च्या हेलिकॉप्टरला बुधवारी लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. जमिनीपासून अवघ्या काही इंचांवर असताना हेलिकॉप्टरचे नियंत्रण सुटले आणि ते एका शेतात कोसळले. या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यामध्ये हेलिकॉप्टर डोंगराळ भागात उतरताना अचानक एका बाजूला कलून डोंगराच्या भिंतीवर आदळताना दिसत आहे. सुदैवाने, या भीषण अपघातात एका प्रवाशाला झालेली किरकोळ दुखापत वगळता इतर सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप बचावले आहेत.
सोसाट्याचा वारा आणि धुळीमुळे दुर्घटना?
प्राथमिक तपासांनुसार, लँडिंगच्या वेळी सुटलेला सोसाट्याचा वारा किंवा जमिनीवरून उडालेली धूळ यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. खोटांग जिल्ह्याच्या मुख्य जिल्हा अधिकारी रेखा कंदेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर एका मृतदेहाचे वहन करत होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. '9N-AFQ' या क्रमांकाच्या या विमानात एकूण पाच प्रवासी होते आणि सकाळी 11:51 च्या सुमारास ही घटना घडली.
बचावकार्य आणि जखमींची प्रकृती
नेपाळच्या नागरी विमानन प्राधिकरणाने (Civil Aviation Authority) या अपघाताला दुजोरा दिला आहे. जखमी प्रवाशाला तातडीने दुसऱ्या एका खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरने उपचारासाठी काठमांडूला हलवण्यात आले आहे. हेलिकॉप्टर कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैमानिक आणि इतर चार प्रवासी सुरक्षित असून त्यांच्या मदतीसाठी दुसरे '9N-ANA' नोंदणी क्रमांकाचे हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. अपघातात हेलिकॉप्टरचा अक्षरशः चक्काचूर झाला असला, तरी कोणतीही जीवितहानी न झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.