T20 World Cup 2026: टी20 विश्वचषक 2026 चा बिगुल वाजण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघात मोठी उलथापालथ झाली आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. 7 फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वीच हा बदल झाल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वृत्तसंस्था ‘एएनआय’च्या माहितीनुसार, हर्षितच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला संघात पाचारण करण्यात आले आहे.
सराव सामन्यात गुडघ्याला झाली दुखापत
हर्षित राणा भारतीय गोलंदाजीतील महत्त्वाचा दुवा मानला जात होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात गोलंदाजी करताना त्याच्या उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर तो स्पर्धा खेळण्यास फिट नसल्याचे स्पष्ट झाले. 6 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत त्याच्या फिटनेसबाबत अंतिम अहवाल येणार असला, तरी परिस्थिती गंभीर असल्याने संघ व्यवस्थापनाने त्याच्या बदली खेळाडूचा निर्णय घेतला आहे.
Mohammed Siraj to join Team India for the T20 World Cup as a replacement for Harshit Rana: Sources — ANI (@ANI) February 6, 2026
गेल्या टी-20 विश्वचषकात मोहम्मद सिराज संघाचा भाग
हर्षित राणा बाहेर पडल्याने, मोहम्मद सिराजचे टीम इंडियाच्या टी-20 संघात पुनरागमन जवळजवळ निश्चित मानले जात आहे. सिराज हा कसोटी आणि एकदिवसीय स्वरूपात टीम इंडियाच्या गोलंदाजी विभागाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु गेल्या दीड वर्षात त्याने एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. सिराजने 2024 च्या श्रीलंकेच्या दौऱ्यात शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी सिराज टीम इंडियाच्या संघाचा देखील भाग होता. आतापर्यंत, सिराजने एकूण 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.