GT in IPL 2026 Finals : IPL 2026 च्या दुसऱ्या ‘क्वालिफायर’ लढतीत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 214 धावांचे विशाल आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने दमदार फलंदाजीच्या जोरावर हे लक्ष्य 18.4 षटकांत 3 गडी गमावून यशस्वीरित्या गाठले. या पराभवासह राजस्थान रॉयल्सचा या स्पर्धेतील प्रवास संपला आहे.
हेही वाचा – Sumit Antil: सुमित अंतिलने पुन्हा रचला इतिहास; 74.82 मीटर भाला फेकत 7 व्यांदा मोडला स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड
सूर्यवंशी आणि जडेजाची झुंजार भागीदारी; राजस्थानचे 214 धावांचे आव्हान
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाचे पहिले 2 गडी अवघ्या 10 धावांच्या आतच बाद झाले. यशस्वी जैस्वाल केवळ 1 धाव काढून बाद झाला, तर ध्रुव जुरेलने 7 धावांचे योगदान दिले. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर वैभव सूर्यवंशी आणि रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सावरत वेगवान धावा जमवल्या. या दोघांनी 127 धावांची शानदार भागीदारी रचली. दरम्यान, दुखापतीमुळे जडेजाला 35 चेंडूंत नाबाद 45 धावांवर ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदान सोडावे लागले. त्यानंतर आलेल्या रियान परागने वैभवची साथ दिली. वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत 96 धावा कुटल्या, मात्र त्याचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. शेवटी डोनोव्हान फरेरा याने अवघ्या 11 चेंडूंत 38 धावांचा स्फोटक कॅमिओ खेळल्यामुळे राजस्थानला 6 बाद 214 धावांपर्यंत पोहोचता आले.
Congratulations to Gujarat Titans on qualifying for the final. A magnificent knock of 104 by Shubman Gill in a high-pressure knockout game. He truly rose to the occasion with a captain’s knock. @ShubmanGill @BCCI @IPL pic.twitter.com/rYC7YoBMcp — Rajeev Shukla (@ShuklaRajiv) May 29, 2026
शुभमन गिलचे वादळी शतक; गुजरातचा शानदार विजय
215 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला साई सुदर्शन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने 167 धावांची मोठी भागीदारी करून मजबूत पाया रचून दिला. साई सुदर्शन 32 चेंडूंत 58 धावा करून ‘हिट विकेट’ बाद झाला. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने कर्णधाराला साजेसा खेळ करत मैदान गाजवले. गिलने 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अवघ्या 53 चेंडूंमध्ये 104 धावांचे शानदार शतक झळकावले. गिल बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने 9 चेंडूंत 16 धावा केल्या. अखेर जोस बटलर (नाबाद 9) आणि राहुल तेवतिया (नाबाद 17) यांनी संघाला 18.4 षटकांत विजय मिळवून दिला आणि अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले.