अहमदाबाद: गुजरात दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) बुधवारी मोठे यश मिळाले आहे. अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) शी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमध्ये एकाच वेळी ही कारवाई पार पडली. एटीएसने अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या कारवाईत मोहम्मद फैज, मोहम्मद फरदीन, सैफुल्लाह कुरेशी आणि झिशान अली यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली. संबंधित आरोपींना त्यांच्या घरी जाऊन अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तथापी, या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डिजिटल कट्टरतावाद –
दरम्यान, एटीएसच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. अटकेतील दहशतवादी अल-कायदाच्या डिजिटल नेटवर्क शी संलग्न होते. हे लोक व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर गट तयार करून कट्टरतावादी विचारसरणी पसरवत होते. त्यांचा उद्देश तरुणांना दहशतवादी नेटवर्ककडे वळवण्याचा होता.
हेही वाचा – इंडिगोच्या अहमदाबाद-दीव विमानात तांत्रिक बिघाड, उड्डाण रद्द
बनावट नोटा व टेरर फंडिंग –
गुजरातमधील अरावली जिल्ह्यातून अटक केलेल्या एका आरोपीकडून बनावट भारतीय नोटा (FICN) आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. तपासात हेही समोर आले आहे की, हा गट बनावट नोटांच्या माध्यमातून टेरर फंडिंग करत होता.
हेही वाचा – ट्रम्प 25 वेळा म्हणाले, मी युद्धबंदी केली, मोदी मात्र…; राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा
गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गुजरात एटीएसने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून तीन दहशतवाद्यांना अटक केली, तर चौथा दहशतवादी गुजरातच्या अरावली जिल्ह्यातून पकडला गेला. ही कारवाई दीर्घकालीन गुप्तचर तपासणीतून शक्य झाली. याआधीही एटीएसने पोरबंदरमध्ये इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांतशी संबंधित दहशतवाद्यांना अटक केली होती. सध्या, अटक केलेल्या सर्व दहशतवाद्यांची सखोल चौकशी केली जात आहे. तसेच त्यांचे नेटवर्क, फंडिंग स्रोत आणि संभाव्य स्लीपर सेलची चौकशी केली जात आहे.