Gudhi Padwa 2026 : सनातन संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याचा सण हा केवळ सण नसून तो नवीन आशा, नवचैतन्य आणि हिंदू नववर्षाचा उज्वल प्रारंभ मानला जातो. महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण भारतात अत्यंत उत्साहात साजरा होणारा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो. पौराणिक मान्यतेनुसार, याच दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना करण्यास सुरुवात केली होती, म्हणूनच या दिवसाला ब्रह्मांडाचा वाढदिवस असेही संबोधले जाते.
यंदाचा मुहूर्त आणि तिथीची वेळ
हिंदू पंचांगानुसार, 2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्चला गुरुवारी साजरा केला जाणार आहे. दृक पंचांगानुसार, चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी सुरू होईल आणि 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4 वाजून 52 मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे सूर्योदयाच्या वेळेनुसार 19 मार्च रोजीच घराघरात गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत केले जाईल.
कडुलिंब खाण्यामागील शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण
गुढीपाडव्याला प्रसादात कडुलिंबाची पाने, गूळ किंवा साखर आणि जिरे यांचे मिश्रण खाण्याची जुनी परंपरा आहे. याचे आध्यात्मिक महत्त्व असे की, जीवनात येणारा कडूपणा (दुःख) आणि गोडवा (सुख) या दोन्ही गोष्टींचा समभावाने स्वीकार केला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर, वसंत ऋतूच्या सुरुवातीला कडुलिंब खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळीसोबतच श्रीखंड-पुरीचा खास बेत आखून देवाला नैवेद्य अर्पण केला जातो.
विजयाचे प्रतीक आणि पौराणिक संदर्भ
गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर उभी केलेली गुढी ही नकारात्मक ऊर्जेचा नाश करून सुख-समृद्धीचे स्वागत करते असे मानले जाते. प्रभू श्रीराम लंका जिंकून अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्यावासीयांनी गुढ्या उभारून आणि घराच्या दरवाज्यांना तोरणे लावून आनंद साजरा केला होता. तसेच, हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयगाथा आणि शालिवाहन शकाची सुरुवात यांच्याशीही निगडित आहे. बांबूची काठी, रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, साखरेची गाठी आणि त्यावर पालथा तांब्याचा कलश अशा स्वरूपात गुढी सजवून मांगल्याची प्रार्थना केली जाते.
असा साजरा करतात गुढी पाडवा
पाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर स्नान करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढली जाते. अंगणात किंवा गॅलरीत उंच काठीला नवीन कापड लावून त्यावर कडुनिंब आणि फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. तसेच, घरालाही नवे तोरण लावले जाते. सूर्योदयाच्या वेळी गुढीची पूजा करून तिला वंदन केले जाते. हा उत्सव वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो. नवीन संकल्पांची सुरुवात करण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)