IPL 2026: RCB आणि KSCA ला हिरवा कंदिल; IPL 2026 चा सलामीचा सामना चिन्नास्वामीवरच रंगणार

या निर्णयानुसार, 28 मार्च रोजी होणारा आयपीएल 2026 चा पहिला सामना बंगळुरूच्या ऐतिहासिक चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.

IPL 2026: RCB आणि KSCA ला हिरवा कंदिल; IPL 2026 चा सलामीचा सामना चिन्नास्वामीवरच रंगणार

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या सलामीच्या सामन्याच्या यजमानपदाबाबत असलेली अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेला (KSCA) राज्य सरकारकडून आयोजनासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. या निर्णयानुसार, 28 मार्च रोजी होणारा आयपीएल 2026 चा पहिला सामना बंगळुरूच्या ऐतिहासिक चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हंगामाच्या या सलामीच्या लढतीत गतविजेता RCB आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) एकमेकांसमोर उभे ठाकतील.

सुरक्षेचा अडथळा दूर; KSCA कडून मुदतीत कामाची पूर्तता
गेल्या वर्षी आरसीबीच्या विजय मिरवणुकीत झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर स्टेडियमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती डी’कुन्हा समितीने सुचवलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 15 मार्चपर्यंतची मुदत दिली होती. ही सर्व कामे वेळेत पूर्ण झाल्याने सरकारने सामन्यांच्या आयोजनासाठी परवानगी दिली आहे. यामुळे आता बंगळुरूच्या चाहत्यांना घरच्या मैदानावर सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

चिन्नास्वामीवर रंगणार 5 सामने; 5 एप्रिलला हायव्होल्टेज ‘RCB vs CSK’
BCCI ने जाहीर केलेल्या पहिल्या 20 सामन्यांच्या वेळापत्रकानुसार, चिन्नास्वामी स्टेडियमवर एकूण पाच सामने खेळले जातील. यामध्ये 5 एप्रिल रोजी होणारा RCB आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामना आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. विशेष म्हणजे, निवडणुकांच्या तारखांमुळे RCB चे दोन ‘होम’ सामने रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर हलवण्यात आले आहेत. उर्वरित हंगामाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IPL 2026 Jerseys Price: मुंबई इंडियन्सनं इथेही बाजी मारली; प्रतिस्पर्धी संघांच्या तुलनेत MI ची जर्सी ठरली सर्वाधिक किमतीची, बाकी टीम्सच्या जर्सीचे अधिकृत दर काय?

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB जेतेपद राखण्यासाठी सज्ज
गेल्या हंगामात पंजाब किंग्सचा पराभव करून आरसीबीने तब्बल 18 वर्षांनंतर आपले पहिले विजेतेपद पटकावले होते. या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरलेला रजत पाटीदार यंदाही संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. जेतेपद राखण्याच्या निर्धाराने पाटीदार आणि त्याचा संघ मैदानात उतरेल. घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा मिळणारा प्रचंड पाठिंबा आरसीबीसाठी किती फायदेशीर ठरतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number