Hardik Pandya: IPL 2026 च्या मोहिमेत दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. कर्णधार हार्दिक पांड्या आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून आगामी सामन्यात तो मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. 4 एप्रिल रोजी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आजारपणामुळे हार्दिक खेळू शकला नव्हता, ज्याचा फटका मुंबईला पराभवाच्या रूपाने बसला. मात्र, आता त्याच्या पुनरागमनामुळे संघाचे बळ वाढले आहे.
हार्दिक पांड्या कधी आणि कुठे परतणार?
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 7 एप्रिल रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या संघासोबत गुवाहाटीसाठी रवाना झाला असून तो लवकरच सराव सत्रात सहभागी होईल. दिल्लीविरुद्धच्या सामन्यावेळी त्याची प्रकृती गंभीर नव्हती, परंतु स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणताही धोका पत्करायला व्यवस्थापन तयार नव्हते. याच कारणामुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता 2 सराव सत्रे हुकल्यानंतर हार्दिक पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.
गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची सद्यस्थिती
IPL 2026 च्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स सध्या 6 व्या स्थानावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यांपैकी त्यांनी 1 सामना जिंकला आहे, तर 1 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या मुंबईचा 'नेट रन रेट' -0.206 इतका आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा विजय मुंबईला गुणतालिकेत वरच्या स्थानी नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा – Payal Nag : सलाम तिच्या जिद्दीला! हात-पाय नसतानाही जिद्दीच्या जोरावर कोरले सुवर्णपदकावर नाव
पुढील आव्हान राजस्थान रॉयल्सचे
7 एप्रिल रोजी होणाऱ्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करून पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्याचे मुंबई इंडियन्सचे लक्ष्य असेल. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनामुळे संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर संतुलन निर्माण होण्याची शक्यता आहे. गुवाहाटीच्या मैदानावर मुंबईचे पलटण कशी कामगिरी करते, याकडे आता सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.