Sri Lanka Cricket Board Appoints Gary Kirsten as New Head Coach : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या थरारानंतर क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाने रविवारी 8 मार्च 2026 रोजी न्यूझीलंडचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले असतानाच, भारताला 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकून देणारे मास्टरमाईंड गॅरी कर्स्टन यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे गॅरी कर्स्टन आता पुन्हा एकदा हेडकोच म्हणून नव्या कारकीर्दीला सुरुवात करणार आहेत. कर्स्टन यांना भारत आणि पाकिस्तान यांसारख्या मोठ्या संघांना प्रशिक्षण देण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
गॅरी कर्स्टन यांच्याकडे 'या' संघाची धुरा
एकीकडे भारतात विजयी जल्लोष सुरू असताना दुसरीकडे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या मुख्य प्रशिक्षकाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दिग्गज प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सनथ जयसूर्या यांची जागा घेतली आहे. ते आता श्रीलंकेच्या संघाला सावरण्याचे काम करणार आहेत. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये नामिबिया संघासाठी सल्लागार म्हणून काम केल्यानंतर, आता त्यांची पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून वर्णी लागली आहे. कर्स्टन यांचा श्रीलंकेसोबतचा हा करार 2 वर्षांसाठी असणार असून, ते 15 एप्रिल 2026 पासून आपला पदभार स्वीकारतील. कर्स्टन यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा श्रीलंकेच्या संघाला त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
सनथ जयसूर्याचा मुदतीआधीच राजीनामा
श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्या याने वर्ल्ड कपमधील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ऑक्टोबरमध्ये मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेल्या जयसूर्याचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत होता. मात्र, सहयजमान असूनही श्रीलंकेचे आव्हान सुपर 8 फेरीतूनच संपुष्टात आल्याने जयसूर्या यांनी स्वतःबाबत हा कठोर निर्णय घेतला. विशेष म्हणजे, सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात 28 फेब्रुवारी 2026 रोजी कधीतरीच धूमकेतूसारखी उसळी घेणाऱ्या पाकिस्तानने श्रीलंकेवर 5 धावांनी मात केली होती, ज्यानंतर जयसूर्याने राजीनामा देण्याचे निश्चित केले होते.
राजीनामा स्वीकारला आणि नवा कोच मिळाला
जयसूर्याने राजीनामा देण्याबाबत बोर्डाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती, त्यामुळे क्रिकेट वर्तुळात तो स्वीकारला जाणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, गॅरी कर्स्टन यांच्या नावाची घोषणा होताच जयसूर्याचा राजीनामा अधिकृतपणे मंजूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. "इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यानच मी या पदावर जास्त काळ राहणार नाही याची जाणीव मला झाली होती, वर्ल्ड कप मोहीम यशस्वी करून निरोप घेण्याचा माझा प्रयत्न होता पण त्यात मी अपयशी ठरलो," अशी खंत जयसूर्याने व्यक्त केली आहे.
श्रीलंका क्रिकेटसाठी नवी सुरुवात
श्रीलंकेची टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरी निराशाजनक राहिली असली तरी, आता गॅरी कर्स्टन यांच्या आगमनाने संघात नवीन उत्साह संचारण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रीलंका संघ सातत्यपूर्ण कामगिरीसाठी संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत कर्स्टन यांचा अनुभव आणि रणनीती श्रीलंकेला पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मोलाची ठरेल. भारतीय चाहत्यांमध्येही या बातमीची मोठी चर्चा आहे, कारण कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऐतिहासिक यश मिळवले होते.