Cricket Records: क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम होत असतात, पण न्यूझीलंडच्या घरगुती क्रिकेटमध्ये असा एक चमत्कार घडला आहे ज्याने जागतिक क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सचा वेगवान गोलंदाज ब्रेट रँडेल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First Class Cricket) सलग 5 चेंडूत 5 बळी घेण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. 254 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला असून, या ‘मॅजिकल स्पेल’मुळे प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडाली.
नेपियरच्या मैदानात रँडेलचे वादळ
ही अविश्वसनीय घटना नेपियर येथे ‘प्लंकेट शिल्ड’ सामन्यादरम्यान घडली. सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स आणि नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स यांच्यातील सामन्याच्या 2ऱ्या दिवशी रँडेलने आपल्या गोलंदाजीने कहर केला. एका क्षणी बिनबाद 4 धावांवर असलेल्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सची अवस्था रँडेलच्या केवळ 5 चेंडूंनंतर 5 बाद 9 अशी झाली. रँडेलने आपल्या 2ऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेन्री कूपरला बाद करून सुरुवात केली. त्यानंतर पुढच्या षटकातील पहिल्या 4 चेंडूंवर अनुक्रमे जीत रावल, जो कार्टर (हॅटट्रिक), रॉबर्ट ओ’डोनेल आणि क्रिश्चियन क्लार्क यांना तंबूत धाडून इतिहास रचला.
82 धावांत संघ गारद, 8 चेंडूत 6 बळी
रँडेलची भूक इथेच शमली नाही. त्याने आपल्या भेदक माऱ्याचा धडाका सुरूच ठेवत बेन पोमारे आणि स्कॉट कुगेलेइजन यांनाही स्वस्तात बाद केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अवघ्या 8 चेंडूत 6 बळी घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने एकूण 11 षटकांत 25 धावा देत 7 गड्यांना बाद केले. त्याच्या या घातक गोलंदाजीमुळे नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सचा संपूर्ण संघ अवघ्या 82 धावांत आटोपला. विशेष म्हणजे, रँडेलने केवळ 3.5 षटकांच्या स्पेलमध्येच 7 बळी मिळवण्याचा पराक्रम केला.
हेही वाचा – T20 World Cup Final: भारत-न्यूझीलंड अंतिम सामना रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या ICC चे नियम
संधी मिळाली आणि इतिहास घडला
आपल्या या कामगिरीवर रँडेल स्वतःही थक्क झाला आहे. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “हे खरंच घडतंय यावर माझा विश्वास बसत नव्हता, मला स्वतःला चिमटी काढून पाहावे लागले. मी फक्त योग्य लाईन आणि लेंथवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होतो.” विशेष म्हणजे, संघातील वरिष्ठ गोलंदाज दुखापतग्रस्त असल्यामुळे रँडेलला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्याने या संधीचे सोने करत आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. यापूर्वी असा पराक्रम T-20 क्रिकेटमध्ये कर्टिस कॅम्फर आणि केलीस एनधलोवू यांनी केला आहे, मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ही पहिलीच वेळ आहे.