Plane Crash Turkey : आंतरराष्ट्रीय संरक्षण वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तान आणि लिबिया यांच्यातील साडेचार अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक शस्त्र करारानंतर काही तासांतच, पश्चिम लिबियाचे लष्करप्रमुख मोहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जागतिक राजकारणात संशयाचे वातावरण निर्माण झाले असून हा अपघात की घातपात, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विमान अपघात आणि कराराचा योगायोग
लिबियाच्या ज्या 'नॅशनल आर्मी'सोबत पाकिस्तानने हा गुप्त करार केला, ते मोहम्मद अल-हद्दाद यांच्या विरोधी गटातील मानले जातात. हद्दाद हे संयुक्त राष्ट्रांची मान्यता असलेल्या त्रिपोलीतील सरकारचे टॉप मिलिट्री कमांडर होते. विशेष म्हणजे, ज्या तुर्कीमध्ये हद्दाद यांच्या विमानाला अपघात झाला, तो देश पाकिस्तान आणि लिबिया या दोन्ही देशांचा मोठा संरक्षण भागीदार आहे. कराराची घोषणा आणि हद्दाद यांचा मृत्यू यांच्यातील अल्प कालावधीमुळे या घटनेकडे संशयाने पाहिले जात आहे.
पाकिस्तानची 'आर्थिक ओढताण' आणि वादग्रस्त डील
दरम्यान, कंगाल अवस्थेत असलेल्या पाकिस्तानसाठी साडेचार अब्ज डॉलरचा हा करार संजीवनी मानला जात आहे. खुद्द लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी गेल्या आठवड्यात पूर्व लिबियातील बेनगाजी शहराचा दौरा करून ही डील फायनल केली होती. मात्र, 2011 पासून पूर्व लिबियावर संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध असतानाही पाकिस्तानने हा करार केल्यामुळे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन झाल्याची टीका होत आहे.
हेही वाचा – High Waged Employees : ट्रम्प प्रशासनाने 'लॉटरी' पद्धत केली बंद, आता उच्च पगारदार उमेदवारांनाच प्राधान्य
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानची स्वतःची शस्त्रनिर्मिती क्षमता इतकी मोठी नाही की ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरवठा करू शकतील. त्यामुळे हा चीनचा एक मोठा कट असू शकतो. चीन पाकिस्तानच्या माध्यमातून आपली शस्त्रे लिबियासारख्या युद्धग्रस्त भागात पोहोचवत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या करारामुळे भविष्यात हमास आणि हिजबुल्ला सारख्या दहशतवादी संघटनांच्या हाती आधुनिक शस्त्रे लागण्याची भीती इस्रायलसह अनेक पाश्चिमात्य देशांना सतावत आहे.
बलुचिस्तानमधून विरोधाचा सूर
या कराराला केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच नव्हे, तर खुद्द पाकिस्तानातूनही विरोध होत आहे. बलुचिस्तानच्या नेत्यांनी असा दावा केला आहे की, लिबिया तर फक्त सुरुवात आहे, पाकिस्तान भविष्यात आपली अण्वस्त्रे तुर्की आणि इराणसारख्या देशांना विकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपघाताच्या जागी संशयाची सुई
ज्या तुर्की भूमीवर हे विमान कोसळले, तिथे अनेक देशांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. चीनचा प्रतिस्पर्धी देश किंवा लिबियातील विरोधी गट या कराराने धास्तावलेले असू शकतात. या सर्व घडामोडी पाहता, हद्दाद यांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून पाकिस्तान-चीन-लिबिया यांच्यातील या 'डेंजरस डील'चा परिणाम तर नाही ना? असा संशय बळावत आहे.