Aashirwad Suryavanshi Century: भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या सूर्यवंशी बंधूंची जोरदार चर्चा सुरू आहे. युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी 26 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 लढतीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या 15 वर्षांच्या वैभवची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये वर्णी लागली असतानाच, आता त्याचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी यानेही स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या बॅटचा जलवा दाखवला आहे. आशीर्वादने एका स्थानिक सामन्यात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत 119 चेंडूंत 168 धावांची तुफानी खेळी साकारली.
10 वर्षीय आशीर्वादची इन्स्टाग्रामवर पोस्ट
अवघ्या 10 वर्षांच्या आशीर्वाद सूर्यवंशीने या सामन्याचे स्कोअरकार्ड आणि आपले छायाचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. त्याने 141.18 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 19 चौकार आणि 6 उत्कृष्ट षटकार खेचले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने निर्धारित 40 षटकांमध्ये 311 धावांचा डोंगर उभा केला.
मुलाला उत्कृष्ट क्रिकेटर बनवण्याचा वडिलांचा संकल्प; आशीर्वादचे सलग दुसरे शतक
काही दिवसांपूर्वीच आशीर्वादने अवघ्या 87 चेंडूंत 103 धावा कुटत आणखी एक शतक आपल्या नावावर केले होते. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी सांगितले की, वैभवप्रमाणेच आशीर्वादलाही येत्या 2 वर्षांत एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून तयार करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. सूर्यवंशी कुटुंबात वैभवला एकूण 3 भाऊ असून, उज्ज्वल आणि विशाल हे त्याचे मोठे भाऊ आहेत, तर आशीर्वाद हा घरातील सर्वात लहान सदस्य आहे.
Vaibhav Sooryavanshi’s brother Ashirvad is smashing hundreds. ?? pic.twitter.com/b1PANkMGNB — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 24, 2026
युके दौऱ्यावर वैभव सूर्यवंशीला ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये मिळण्याची शक्यता
दुसरीकडे, युके (UK) दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार असून, त्यानंतर इंग्लंडसोबत 5 टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. या एकूण 7 सामन्यांमध्ये वैभवला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारताच्या टी-20 संघातही वैभवची निवड करण्यात आली होती.