Para Shot Put Gold Medalist Sharmila Dhankhar Inspiring Story: कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या 40 वर्षीय पॅरा ॲथलीट शर्मिला धनखड हिने सुवर्णपदकावर नाव कोरून नवा इतिहास रचला आहे. महिलांच्या शॉट पुट F57 (गोळाफेक) प्रकारात तिने या मोसमातील 9.81 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत हे सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे हे पॅरा ॲथलेटिक्समधील पहिलेच सुवर्णपदक ठरले असून भारताची तब्बल 20 वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपली आहे. याच स्पर्धेत अधिकृत पुनरावलोकनानंतर भारताची दुसरी खेळाडू शिल्पा शायला हिने 7.26 मीटर वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक मिळवले.
बालपणी पोलिओची लागण अन् कौटुंबिक संघर्ष
हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील चित्रौली या छोट्याशा गावात एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात शर्मिलाचा जन्म झाला. तिची आई दृष्टिहीन होती आणि आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. अवघ्या 2 वर्षांची असताना शर्मिलाला पोलिओ झाला आणि योग्य उपचारांअभावी तिचा डावा पाय नेहमीसाठी निकामी झाला. कमी वयातच तिचे लग्न लावून देण्यात आले, परंतु सासरच्यांकडून हुंड्यासाठी सातत्याने होणारा छळ आणि अपमान तिला सहन करावा लागला. अखेर 25 ते 26 वर्षांची असताना आपल्या दोन लहान मुलींना घेऊन तिने ते घर सोडले आणि आई-वडिलांकडे परत आली.
दुसरे लग्न अन् क्रीडा क्षेत्रातील नवी पहाट
अत्यंत खडतर काळातून जात असताना 28 व्या वर्षी शर्मिलाचे लग्न अजित सिंह यांच्याशी झाले. अजित यांनी वर्तमानपत्रातील बातमी पाहून शर्मिलाला खेळाकडे वळण्यासाठी प्रेरित केले आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वयाच्या 34 व्या वर्षी तिने पॅरा ॲथलेटिक्समध्ये पाऊल ठेवले. F57 श्रेणीतील शॉट पुट आणि डिस्कस थ्रो प्रकारात तिने कठोर परिश्रम घेतले. वर्षा 2021 मधील पहिल्याच नॅशनल पॅरा चॅम्पियनशिपमध्ये 7.40 मीटरचा थ्रो करून तिने राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
हेही वाचा – Bindyarani Devi: भारताच्या खात्यात आणखी एक पदक; बिंद्याराणी देवीची वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकाची कमाई
शर्मिला धनखडची आतापर्यंतची प्रमुख कामगिरी
– 2021 नॅशनल पॅरा चॅम्पियनशिप: 7.40 मीटर थ्रोसह राष्ट्रीय विक्रम आणि सुवर्णपदक.
– 2022 बर्मिंघम राष्ट्रकुल खेळ: पदक थोडक्यात हुकले; परंतु 8.43 मीटरचा नवा राष्ट्रीय विक्रम केला.
– 2023 आशियाई पॅरा गेम्स (हांगझोऊ): अंतिम फेरीत चौथे स्थान मिळवले.
– 2025 इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स (बेंगळुरू): 9.77 मीटर थ्रो करून सुवर्णपदक जिंकले.
– 2026 फज्जा इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स (दुबई): शॉट पुटमध्ये सुवर्ण आणि डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक मिळवले.
– 2026 राष्ट्रकुल खेळ (ग्लासगो): 9.81 मीटरच्या थ्रोसह ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले.