CSK New Head Coach: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 च्या आगामी हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान याची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्सला त्यांचे 6 वे विजेतेपद मिळवून देण्याचे मुख्य उद्दिष्ट झहीर खान यांच्यासमोर असणार आहे. विशेष म्हणजे झहीर यांना आयपीएलमधील प्रशिक्षणाचा आणि प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. अलीकडेच ते कॅनडातील 'व्हँकुव्हर अँकर्स' (Vancouver Anchors) या संघाशीही जोडले गेले होते.
झहीर खान यांचा दांडगा प्रशिक्षकीय अनुभव
2017 मध्ये आयपीएलमधून खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर झहीर खान यांनी विविध भूमिका यशस्वीपणे बजावल्या आहेत. आपल्या खेळाडू कारकिर्दीत ते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचे प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर 2019 च्या आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सने त्यांची 'संचालक – क्रिकेट ऑपरेशन्स' म्हणून नियुक्ती केली होती आणि नंतर त्यांनी 'ग्लोबल डेव्हलपमेंट' प्रमुखाची जबाबदारी सांभाळली. झहीर खान आयपीएल 2025 साठी लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक (मेन्टर) म्हणून कार्यरत होते, मात्र आगामी हंगामापूर्वी त्यांनी त्या फ्रँचायझीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
स्टीफन फ्लेमिंग यांच्या 18 वर्षांच्या युगाचा अंत
चेन्नई सुपर किंग्समध्ये झहीर खान हे न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांची जागा घेतील. फ्लेमिंग यांनी 2009 ते 2026 या प्रदीर्घ काळात तब्बल 18 वर्षे चेन्नईच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. सीएसकेला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवण्यात फ्लेमिंग यांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जुलैमध्ये नियुक्ती झाल्यामुळे फ्लेमिंग यांनी चेन्नई फ्रँचायझीसोबतचा आपला दीर्घकालीन प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला.
सीएसकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर झहीरची प्रतिक्रिया
सीएसकेमध्ये सामील होणे हा आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीतील एक मैलाचा दगड असल्याचे झहीर खान यांनी सांगितले. खेळाडू म्हणून झहीर यांनी 100 आयपीएल सामने खेळले असून 27.27 च्या सरासरीने 102 बळी (विकेट्स) मिळवले आहेत. तसेच भारतीय संघाकडून खेळताना त्यांनी तिन्ही प्रकारांत मिळून 610 आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत. "सीएसके फ्रँचायझीचा भाग होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. चेपॉक स्टेडियमवरील 'सुपरफॅन्स'मुळे तयार होणारे वातावरण अद्भुत असते आणि या समृद्ध वारशाचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे," अशी प्रतिक्रिया झहीर यांनी दिली.
फ्रँचायझी मालक रूपा गुरुनाथ यांच्याकडून स्वागत
झहीरचे संघात स्वागत करताना सीएसकेच्या मालक रूपा गुरुनाथ म्हणाल्या, "झहीर खान हे चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक असतील, हे जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यांची खेळाडू म्हणून असलेली शानदार कारकीर्द आणि युवा प्रतिभेला घडवण्याची त्यांची क्षमता यामुळे ते आमच्या संघासाठी मोलाचे ठरतील. त्यांच्या मार्गदर्शनामुळे फ्रँचायझीचा पाया अधिक मजबूत होईल, असा विश्वास आम्हाला आहे."