Cheapest Petrol in the World : भारतात पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांच्या आसपास असताना, जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक असा देश आहे जिथे इंधन पाण्यापेक्षाही स्वस्त मिळते. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात पेट्रोलची किंमत ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही. या देशात एक लिटर पेट्रोलसाठी अवघा 1 रुपया मोजावा लागतो. म्हणजेच, भारतात जेवढ्या किमतीत एक साधे चॉकलेट मिळते, तेवढ्या पैशात व्हेनेझुएलामध्ये एक लिटर पेट्रोल आरामात खरेदी करता येते. जर तुमच्या गाडीची टाकी अवघ्या 50 रुपयांत फुल्ल होऊ शकते. ही या देशातील सामान्य बाब आहे.
राजकीय उलथापालथ आणि तेलाचा खजिना
सध्या व्हेनेझुएला केवळ त्याच्या स्वस्त पेट्रोलमुळेच नव्हे, तर तिथे सुरू असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून न्यूयॉर्कमधील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या कारवाईमागे व्हेनेझुएलातील अफाट खनिज तेलाच्या साठ्यावर ताबा मिळवण्याचे अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे बोलले जाते. इंधनाच्या बाबतीत अत्यंत समृद्ध असलेल्या या देशात पेट्रोलचे दर 0.01 ते 0.035 डॉलर इतके अल्प आहेत, जे भारतीय चलनात 1 ते 3 रुपये प्रति लिटरच्या दरम्यान भरतात.
दुहेरी इंधन प्रणाली: सबसिडी आणि प्रीमियम
व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल विक्रीची एक विशेष 'दुहेरी इंधन प्रणाली' राबवली जाते. या अंतर्गत दोन प्रकारे पेट्रोल उपलब्ध होते. पहिली पद्धत म्हणजे सरकारकडून मिळणारे सबसिडीचे पेट्रोल, जे प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी असते आणि त्याची किंमत 1 रुपयांच्या आसपास असते. दुसरी पद्धत म्हणजे 'प्रीमियम पेट्रोल', ज्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार ठरतात. विशेष म्हणजे, या प्रीमियम पेट्रोलचा दरही भारताच्या तुलनेत खूपच कमी, म्हणजेच साधारण 42 रुपये प्रति लिटर इतका आहे. प्रिमियम पेट्रोलने 50 लिटरची टाकी फुल्ल करण्यासाठी तिथे 1700 ते 2100 रुपये लागतात.
हेही वाचा – Oil Reserves Cost: अमेरिकेचा 'ऑईल स्ट्राईक'! ट्रिलियन डॉलर्समध्ये किंमत असलेले 'या' देशातील तेलसाठे गिळणार
इंधन क्षेत्रातील जागतिक 'बादशाह'
नैसर्गिक संपत्तीचा विचार केला तर व्हेनेझुएला हा जगातील इंधन क्षेत्राचा खरा बादशाह मानला जातो. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, 2023 पर्यंत या देशाकडे तब्बल 303 अब्ज बॅरल तेलाचा प्रचंड साठा होता. या यादीत व्हेनेझुएला पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो, ज्यांच्याकडे 267.2 अब्ज बॅरल साठा आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इराणकडे 208.6 अब्ज बॅरल, तर चौथ्या क्रमांकावरील कॅनडाकडे 163.6 अब्ज बॅरल तेलाचे भांडार उपलब्ध आहे.
एकीकडे जगात तेलाच्या किमतीवरून युद्धे होत असताना, व्हेनेझुएलातील हे कवडीमोल दरातील पेट्रोल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. भारतासारख्या देशात जिथे इंधन टाकी फुल्ल करण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात, तिथे अवघ्या 50 ते 150 रुपयांत गाडीची टाकी फुल्ल होणे हे एखाद्या स्वप्नासारखेच वाटते. मात्र, या स्वस्त तेलासोबतच तेथील राजकीय अस्थिरता हा चिंतेचा मोठा विषय ठरत आहे.
हेही वाचा – Donald Trump: ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आकड्यांसह दिली माहिती, म्हणाले टॅरिफमधून कमावले..