Nepal Bus Accident: नेपाळच्या मध्यवर्ती भागातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. भारतीय भाविकांना घेऊन जाणारी एक प्रवासी बस नियंत्रणाबाहेर जाऊन दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. ही घटना शनिवारी नेपाळच्या गंडकी प्रांतातील गोरखा जिल्ह्यात घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस प्रसिद्ध 'मनकामना मंदिरा'चे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. या घटनेत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर अनेक जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये सर्व भारतीय नागरिकांचा समावेश
जिल्हा वाहतूक पोलीस कार्यालयाचे प्रमुख सूरज अर्याल यांनी स्पष्ट केले आहे की, मृतांमध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश असून, हे सर्व मृत नागरिक भारतीय आहेत. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून, यामध्ये मुथू कुमार (58), अनामलिक (58), मीनाक्षी (59), शिवगामी (53), विजयल (57), मीना (58) आणि तामिलरसी (60) यांचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जखमींवर उपचार आणि तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. 'द काठमांडू पोस्ट'च्या वृत्तानुसार, इतर 7 जखमी प्रवाशांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यांना उपचारासाठी अबुखैरेनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या इलेक्ट्रिक बसचा चालक सुरक्षित असून त्याचा मदतनीस जखमी झाला आहे. पोलीस सध्या हा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाचा ताबा सुटल्याने, याचा सखोल तपास करत आहेत.