Controversial Run Out: क्रिकेटला सज्जनांचा खेळ मानले जाते, परंतु ढाका येथील ‘शेर-ए-बांगला स्टेडियम’वर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात या प्रतिमेला तडा गेला. बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराजने ‘खेळाची भावना’ धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या सलमान अली आगाला ज्या पद्धतीने ‘रन आउट’ केले, ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रसंगानंतर मैदानावर खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि संतापलेल्या सलमानने भर मैदानावर आपले हेल्मेट आणि ग्लोव्हज भिरकावून दिले.
मदतीचा प्रयत्न पडला महागात; मिराजची धक्कादायक कृती
ही घटना पाकिस्तानच्या डावातील 39 व्या षटकात घडली. मोहम्मद रिझवानने मारलेला चेंडू ‘नॉन-स्ट्रायकर’च्या बाजूला उभ्या असलेल्या सलमान आगाच्या बॅटला लागला. या गोंधळात सलमान आणि मिराज यांची किरकोळ धडकही झाली. चेंडू आता ‘डेड’ झाला आहे असे समजून, सलमानने खिलाडूवृत्ती दाखवत तो चेंडू उचलला आणि मिराजला परत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिराजने ती संधी साधत सलमानच्या हातातून चेंडू हिसकावून घेतला आणि त्याला धावबाद केले. या अनपेक्षित प्रकारामुळे सलमान आगा पूर्णपणे अवाक झाला.
मैदानावर गोंधळ आणि पंचांची हतबलता
मिराजच्या या वागण्यामुळे सलमानचा संयम सुटला. त्याने मिराज आणि यष्टिरक्षक लिटन दास यांच्यावर संतापाने हल्लाबोल केला. “मी केवळ चेंडू परत करत होतो, धाव घेण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता,” असा युक्तिवाद त्याने केला. मात्र, नियमांनुसार चेंडू अधिकृतपणे ‘डेड’ नसल्याने तिसऱ्या पंचांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत आगाला बाद ठरवले. या निर्णयामुळे सलमानचा राग अनावर झाला आणि त्याने आपले हेल्मेट मैदानावर जोरात आपटले.
शिवीगाळ आणि रिझवानची मध्यस्थी
मैदानाबाहेर जातानाही सलमान आगाचा राग शांत झाला नव्हता. त्याने बांगलादेशी खेळाडूंवर शिवीगाळीची सरबत्ती केली. परिस्थिती इतकी चिघळली की, लिटन दासला वाचवण्यासाठी पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवानला मध्यस्थी करावी लागली. सीमारेषा ओलांडल्यानंतरही सलमानचा संताप कायम होता. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी मिराजच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.
हेही वाचा –CSK ला चित्रपटांची गाणी वापरणं पडलं महागात; या टीव्ही कंपनीने ठोकला कॉपीराइटचा दावा, काय आहे प्रकरण?
Salman Ali Agha tried to pick up the ball and give it back to the bowler, but the bowler ran him out. ? Another day, another joker moment for Pakistan.??? pic.twitter.com/GqD3etuY77 — ????????!??_?? (@bholination) March 13, 2026
पाकिस्तानचा डाव कोसळला; ‘तो’ ठरला टर्निंग पॉईंट
या वादाचा मोठा फटका पाकिस्तानच्या खेळाला बसला. 38.3 षटकांपर्यंत पाकिस्तानची स्थिती 3 बाद 231 अशी मजबूत होती. मात्र, सलमान बाद झाल्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांचे लक्ष विचलित झाले. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने जाणारा संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि अवघ्या 23 चेंडूंमध्ये पाकिस्तानने आपले 4 महत्त्वाचे गडी गमावले. मिराजच्या त्या एका वादग्रस्त निर्णयाने सामन्याचे पूर्ण चित्रच पालटून टाकले.