Railway Fare Hike: रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकिट दरात वाढ जाहीर केली असून ही भाडेवाढ 26 डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा आर्थिक फटका बसणार आहे.
नवीन भाडेरचना काय आहे?
रेल्वेने जाहीर केलेल्या नव्या भाडेरचनेनुसार, 215 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी सामान्य श्रेणीत कोणतीही भाडेवाढ होणार नाही. 215 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी सामान्य श्रेणीसाठी प्रति किलोमीटर 1 पैसा वाढ करण्यात आली असून मेल/एक्सप्रेस नॉन-एसी आणि एसी श्रेणीसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे वाढ लागू होईल.
रेल्वेला मिळणार 600 कोटींचा महसूल
या भाडेवाढीमुळे भारतीय रेल्वेला 600 कोटींपेक्षा अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. उदाहरणार्थ, नॉन-एसी गाडीतून 500 किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला सध्याच्या भाड्यापेक्षा सुमारे 10 रुपये अधिक मोजावे लागतील.
दिल्ली-पाटणा प्रवास किती महाग?
दिल्ली ते पाटणा हे अंतर अंदाजे 1,000 किलोमीटर आहे. सध्या राजधानी एक्सप्रेसच्या थर्ड एसी श्रेणीचे भाडे सुमारे 2,395 आहे. नव्या दरवाढीनंतर प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढ झाल्याने तिकिटात 20 रुपायांनी वाढ होईल आणि सुधारित भाडे लागू होईल.
दिल्ली- मुंबई प्रवासाचा नवा खर्च
दिल्ली ते मुंबई रेल्वे मार्गाचे अंतर अंदाजे 1,386 किलोमीटर आहे. सध्या 3 एसी सीएसएमटी राजधानी एक्सप्रेसचे भाडे 3,180 आहे. दरवाढीनंतर प्रति किलोमीटर 2 पैशांनुसार भाडे सुमारे 27 ने वाढून 3,207 होईल.
यंदाची दुसरी भाडेवाढ
महत्त्वाचे म्हणजे, ही यंदातील दुसरी रेल्वे भाडेवाढ आहे. याआधी 1 जुलै 2025 रोजीही तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्या वेळी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैसा, तर एसी गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढवण्यात आले होते. एकूणच, नव्या दरवाढीमुळे रेल्वेचा प्रवास थोडा महाग होणार असला, तरी रेल्वेच्या महसुलात मोठी भर पडणार आहे.