Babar Azam: टी-20 विश्वचषक 2026 मधील मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अखेर कठोर पाऊल उचलले आहे. सातत्याने अपयशी ठरणाऱ्या आणि बॅटमधून धावा काढण्यात अपयशी ठरलेल्या बाबर आझमला पाकिस्तानच्या एकदिवसीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. विश्वचषकातील खराब कामगिरीचे खापर आता फुटले असून, निवड समितीने संघात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाबर आझमच्या कारकिर्दीला ब्रेक?
नुकत्याच संपलेल्या टी-20 विश्वचषकात बाबर आझमची कामगिरी अत्यंत लाजीरवाणी ठरली होती. 6 सामन्यांत त्याने केवळ 91 धावा केल्या, ज्यामुळे त्याला स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात अंतिम 11 मधूनही वगळण्यात आले होते. आता बांगलादेशविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघातूनही त्याचे नाव गायब आहे. केवळ बाबरच नाही, तर सईम आयुब आणि मोहम्मद नवाज या खेळाडूंनाही बोर्डाने डच्चू दिला आहे.
शाहीन आफ्रिदीकडे धुरा; संघात नव्या चेहऱ्यांची गर्दी
बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तानने अनुभवी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्यावर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपद सोपवले आहे. या संघात पीसीबीने तरुण खेळाडूला प्राधान्य दिले असून तब्बल 6 नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
मालिकेचे वेळापत्रक (स्थळ: ढाका):
पहिला सामना: 11 मार्च
दुसरा सामना: 13 मार्च
तिसरा सामना: 15 मार्च
निवड समितीवरही कारवाईची कुऱ्हाड
दरम्यान, संघातील बदलांसोबतच बोर्डाच्या प्रशासकीय पातळीवरही मोठे बदल झाले आहेत. निवड समितीचे सदस्य अलीम दार यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. विश्वचषकात भारताकडून झालेली हार आणि इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली नाचक्की धुवून काढण्यासाठी पीसीबीने ही मोठी कारवाई केल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानचा 15 सदस्यीय नवा संघ:
शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), हारिस रऊफ, अबरार अहमद, फहीम अशरफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, सलमान अली आगा, हुसेन तलत, फैसल अकरम आणि नवे खेळाडू: अब्दुल समद, माज सदाकत, मुहम्मद गाजी गोरी (यष्टिरक्षक), साद मसूद, साहिबजादा फरहान, शमील हुसेन.