Pet Dog Walking on Track : एका उच्चभ्रू अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये पाळीव कुत्र्याला फिरवण्यावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. इथे ज्येष्ठ नागरिक आणि एका रहिवाशामध्ये जोरदार हाणामारी झाली. कुत्र्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या चालण्याच्या जागेवर लघवी केल्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण अरोरा नावाचा रहिवासी आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी खाली आला होता. अपार्टमेंटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी एक स्वतंत्र जागा राखीव आहे. अरोरा तिथे कुत्र्याला घेऊन आल्याने आणि कुत्र्याने तिथेच लघवी केल्याने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी त्याला जाब विचारला. शाब्दिक चकमकीचे रूपांतर लवकरच शारीरिक संघर्षात झाले. तक्रारीनुसार, जवळपास 7 ते 8 ज्येष्ठ नागरिकांनी मिळून अरोरा याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिथल्याच एका महिलेने मध्यस्थी करून हा वाद सोडवला; अन्यथा, परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकली असती. बंगळुरूमध्ये वर्थूर भागातील ‘ब्रिगेड युटोपिया ईस्ट अँटोपिया’ अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली.
दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी आणि सीसीटीव्ही फुटेज
या घटनेनंतर तरुण अरोरा याने वर्थूर पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. मात्र, या प्रकरणाला तेव्हा वेगळे वळण मिळाले जेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या गटातील एका महिलेने अरोरा विरुद्ध उलट तक्रार (Counter-complaint) दाखल केली. अरोरानेच आधी हल्ला केला आणि धमकावले, असा आरोप या महिलेने केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्येष्ठ नागरिक व्यायाम करताना दिसत असून अरोरा तिथे कुत्रा घेऊन आल्याचे दिसते. तसेच, शाब्दिक वादादरम्यान तो मोबाईलवरून ज्येष्ठ नागरिकांचा व्हिडिओ शूटिंग करत असल्याचेही दिसते. यानंतर एका वृद्ध व्यक्तीने चिडून अरोराजवळ येत त्याचा फोन हातातून हिसकावून फेकून दिल्याचे दिसते. त्यानंतर हाणामारी सुरू झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
An unfortunate dispute in Varthur, Bengaluru over a pet in a walking area has escalated. Such matters, especially those involving senior citizens, must be resolved with calm, mutual respect, and a sense of community. Perhaps it is time they watched Lage Raho Munna Bhai. pic.twitter.com/3ucVNmw9NS — P C Mohan (@PCMohanMP) March 7, 2026
परदेशात राहणाऱ्या मुलांचा उल्लेख आणि दहशतीचे वातावरण
ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या तक्रारीत असाही आरोप करण्यात आला आहे की, अरोराने त्यांना धमकावताना त्यांच्या परदेशात राहणाऱ्या मुलांचा उल्लेख केला. “तुमची मुले परदेशात राहतात, मी तुम्हाला सोडणार नाही,” असे शब्द वापरून त्याने भीती घातल्याचा दावा ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे. या धमकीमुळे आपण असुरक्षित असून आपल्याला पोलीस संरक्षणाची गरज असल्याचे या ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे. सध्या पोलीस दोन्ही बाजूंच्या तक्रारींची दखल घेत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नेमकी चूक कोणाची होती, याचा तपास करत आहेत.
पाळीव प्राण्यांच्या नियमांवरून पुन्हा एकदा चर्चा
मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाळीव प्राण्यांना फिरवणे आणि त्यांच्या स्वच्छतेबाबतचे नियम नेहमीच वादाचा विषय ठरतात. बेंगळुरूमधील या घटनेने पुन्हा एकदा रहिवासी आणि पाळीव प्राणी मालकांमधील संघर्षाला वाचा फोडली आहे. या मारहाणीमुळे अपार्टमेंटमध्ये दहशतीचे वातावरण असून, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण पिढीतील संवाद खुंटल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही, मात्र तपास सुरू आहे.
हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा सरकारी संस्थांना कडक इशारा! कोर्टाचे आदेश पाळा, अन्यथा…