IPL 2026 Retirement : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू आणि आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जाणारा आंद्रे रसेल आता मैदानात चौकार-षटकारांचा वर्षाव करताना दिसणार नाही. आगामी मिनी-लिलावाच्या अगोदरच रसेलने आयपीएलला अलविदा करण्याची घोषणा केली आहे. परंतु, चाहत्यांसाठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे रसेल केकेआरपासून दूर जाणार नसून, आगामी हंगामापासून तो संघाच्या कोचिंग सेटअपचा ‘पॉवर कोच’ म्हणून नवा अध्याय सुरू करणार आहे.
नवीन जबाबदारीसह केकेआरमध्ये पुनरागमन
16 डिसेंबरला होणाऱ्या आयपीएल मिनी-लिलावापूर्वी रसेलने सोशल मीडियावर पोस्ट करत आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. तो म्हणाला, “12 वर्षांचा आयपीएल प्रवास अविस्मरणीय होता. पण मी केकेआर कुटुंब सोडणार नाही. 2026 पासून मी ‘पॉवर कोच’ म्हणून संघात नवी भूमिका स्वीकारणार आहे. तीच ऊर्जा कायम राहील, मी कायम ‘नाईट’च राहीन.” 2014 पासून केकेआरचा अविभाज्य भाग असलेल्या रसेलने पुढील वर्षी कोचिंग स्टाफमध्ये औपचारिकरित्या प्रवेश करणार आहे.
हेही वाचा – Rohit Sharma: "फिटनेस, कामगिरीसह भविष्यावर लक्ष द्या…" BCCI कडून रोहित शर्माला स्पष्ट आदेश
पोलार्डच्या पावलावर पाऊल
किरॉन पोलार्डप्रमाणेच रसेलही खेळाडूपदावरून थेट कोचिंगमध्ये प्रवेश करणारा कॅरिबियन स्टार ठरला आहे. पोलार्ड मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच आहे, तर रसेल आता केकेआरसाठी ताकदीच्या हिटिंगवर आणि टॅक्टिकल स्ट्रॅटेजीवर काम करणार आहे. केकेआरचे प्रमुख अधिकारी वेंकी मैसूर आणि मालक शाहरुख खान यांनीही रसेलच्या निर्णयाचे स्वागत केले असून, दोघांनीही त्याला संघाचा “कुटुंबातील सदस्य” म्हटले आहे.
हेही वाचा – Vijay Hazare Trophy: दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर विराटचा मोठा निर्णय! 16 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत खेळणार?
निवृत्तीचे कारण काय?
रसेलचे म्हणणे आहे की, विविध फ्रँचायझींच्या जर्सीतील त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहून त्याला अस्वस्थ वाटत होते. तो म्हणाला की, “जांभळी-सोनेरी जर्सी (KKR) शिवाय मला स्वतःची कल्पनाच होत नव्हती.” त्यामुळेच रसेलने आयपीएलचा अध्याय संपवण्याचा निर्णय घेतला असून, आगामी वर्षांत जगभरातील टी 20 लीगमध्ये खेळत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.