Uttarakhand Bus Accident: उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. भिकियासैन-विनायक मोटर मार्गावर प्रवाशांनी भरलेली बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पहाटेच्या सुमारास काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस सकाळी 6 वाजता द्वारहाट येथून रामनगरच्या दिशेने जाण्यासाठी निघाली होती. भिकियासैनजवळील शिलापाणी येथे पोहोचल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. हा भाग जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असल्याने मदत पोहोचण्यास आव्हानांचा सामना करावा लागला.
हेही वाचा – Supreme Court: अरवली प्रकरणात मोठा ट्विस्ट! सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या निर्णयावर दिली स्थगिती
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ (SDRF) आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अल्मोडाचे एसएसपी देवेंद्र पिंचा यांनी सांगितले की, बचाव पथके घटनास्थळी कार्यरत असून जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी भिकियासैन येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना उच्च वैद्यकीय केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे. अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट झाला नसला तरी, प्राथमिक अंदाजानुसार 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त शोक
या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "भिकियासैन-विनायक रस्त्यावरील ही घटना अत्यंत वेदनादायक आणि हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना करतो. जिल्हा प्रशासन जखमींना तातडीने मदत पुरवत असून मी स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे." सध्या घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम प्रशासन करत आहे.