Tuljapur Temple : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, अस्वच्छता करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मंदिर परिसरात कचरा टाकणे, कुंकू उधळणे किंवा परिसर घाण करणाऱ्या व्यक्तींवर 500 रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
स्वच्छतेसाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती
मंदिर परिसर अधिक स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी मंदिर संस्थानकडून दोन विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके परिसरात नियमित पाहणी करणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे परिसरात स्वच्छता राखणे हे मोठे आव्हान बनले असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भाविकांना सहकार्याचे आवाहन
तुळजाभवानी मंदिर परिसराची पवित्रता आणि स्वच्छता अबाधित राहावी यासाठी सर्व भाविकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मंदिर परिसरात कचरा न टाकणे, धार्मिक साहित्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि स्वच्छतेबाबत जागरूकता दाखवणे ही प्रत्येक भाविकाची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.