World's Largest Shivling : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवलिया या ठिकाणी विराट रामायण मंदिर साकारलं जात आहे. या ठिकाणी जगातील सर्वात मोठं शिवलिंग स्थापित करण्यात येणार आहे. हे सर्वात मोठं शिवलिंग शनिवारी बिहारमध्ये पोहोचलं असून भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. या शिवलिंगाचं भाविकांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
तमिळनाडूतील महाबलीपुरम येथून निघालेले जगातील सर्वात मोठे शिवलिंग अखेर बिहारमध्ये दाखल झाले आहे. काळ्या ग्रॅनाइटच्या एकाच अखंड दगडातून (मोनोलिथ) साकारलेले हे भव्य शिवलिंग तब्बल 33 फूट उंच असून त्याचे वजन 210 टन आहे. तमिळनाडू ते बिहार अशा सुमारे 45 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासात हे शिवलिंग आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून गेले आहे. तब्बल 2,500 किमी अंतर कापून हे शिवलिंग आता बिहारमध्ये पोहोचले आहे. आता गोपालगंजवरून कैथवालिया या ठिकाणी हे शिवलिंग नेण्यात येत आहे. मार्गामध्ये विविध ठिकाणी भाविकांनी या शिवलिंगाचे जंगी स्वागत केले. आता 17 जानेवारी रोजी पूर्व चंपारणमधील केसरिया येथील 'विराट रामायण मंदिरा'त या शिवलिंगाची विधीवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
10 वर्षांची मेहनत आणि ऐतिहासिक प्रवास
या महाकाय शिवलिंगाची निर्मिती महाबलीपुरममधील पट्टीकाडू गावात करण्यात आली असून, ते तयार करण्यासाठी कारागिरांना सुमारे 10 वर्षांचा काळ लागला. शिवलिंगावर 1008 सहस्त्रलिंगम अत्यंत सुबकपणे कोरण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या वजनाचे शिवलिंग रस्तेमार्गाने नेण्यासाठी 96 चाकांचा एक विशेष ट्रक वापरण्यात आला आहे. 5 जानेवारी रोजी हे शिवलिंग गोपालगंजमधील बलथरी येथे पोहोचेल, जिथे वाजतगाजत आणि भव्य प्रवेशद्वारासह त्याचे स्वागत केले जाईल. त्यानंतर खजुरिया आणि हुसैनीमार्गे हे शिवलिंग केसरिया येथील मंदिर परिसरात पोहोचणार आहे.
हेही वाचा – Panchank Yog : 2026 मध्ये या राशींसाठी नशिबाचं दार उघडणार! सूर्य-शनीचा 'पंचांक योग' ठरेल भाग्यकारक
विराट रामायण मंदिर: जगातील सर्वात मोठे देवालय
पद्मश्री आचार्य किशोर कुणाल यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर ठरणार आहे. महावीर मंदिर न्यास समितीद्वारे या मंदिराचे बांधकाम सुरू असून ते 1080 फूट लांब आणि 540 फूट रुंद असणार आहे. या भव्य वास्तूमध्ये एकूण 18 शिखर आणि 22 उप-मंदिरे असतील, ज्यातील मुख्य शिखराची उंची 270 फूट इतकी असेल. पाटण्यापासून साधारण 120 किलोमीटर अंतरावर जानकीनगर येथे हे मंदिर उभारले जात असून, जून 20, 2023 रोजी त्याचे शिलान्यास करण्यात आले होते.
स्थापना आणि धार्मिक विधी
मंदिराचे एसीईओ बी.के. मिश्रा आणि अधीक्षक सुधाकरन यांच्या माहितीनुसार, 17 जानेवारीला शिवलिंगाची पीठ पूजा, हवन आणि इतर धार्मिक विधी पार पडतील. मंदिर परिसरात भाविकांसाठी 4 आश्रमही बांधले जाणार आहेत. या ऐतिहासिक मंदिरामुळे आणि जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगामुळे बिहारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असून, हे धार्मिक स्थळ जगभरातील भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल.