Eknath Shinde: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. सध्या नागपुरात विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची सत्रे रंगत आहेत. या सत्रातच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा दावा अनेक नेत्यांकडून करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही याबाबत मत मांडले, ज्यामुळे चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.
आज विधानपरिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिले. शिंदे म्हणाले की, ‘लाडकी बहीण’ योजना बंद पडणार नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीरनाम्यानुसार पूर्ण केली जाईल. त्यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले, शेतकऱ्यांच्या नावावर काही लोक राजकारण करत आहेत. अतिवृष्टीच्या काळात काही लोक शेतकऱ्यांकडे रिकाम्या हाताने गेले, मात्र आम्ही सदैव शेतकऱ्यांसोबत होतो.
हेही वाचा – Ramdas Athawale on Uddhav Thackeray: राज ठाकरेंची साथ उद्धव ठाकरेंना भोवणार; रामदास आठवलेंचा मोठा दावा
दरम्यान, शिंदे यांचे भाषण चालू असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे विरोधी बाकावर बसले होते. त्यांनी म्हटलं की, मला पत्रकार सांगत होते की एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत, हे खरे आहे का? मात्र एकनाथ शिंदे यांनी शशिकांत शिंदेच्या टोलेबाजीवर थेट उत्तर दिले नाही आणि आपले भाषण पुढे चालू ठेवले. मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेमुळे आणि शशिकांत शिंदेच्या प्रश्नावर प्रतिक्रिया न दिल्यामुळे सत्रात राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे.