Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळापासून चर्चेत असलेले 'ऑपरेशन टायगर' अखेर प्रत्यक्षात आले असून, उद्धव ठाकरे यांच्या गटाला संसदेत फार मोठे खिंडार पडले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या एकूण 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांना आपल्या गोटात खेचण्यात यश मिळवले. या सर्व बंडखोर खासदारांना सोबत घेऊन शिंदे यांनी बुधवारी सकाळी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे अधिकृत पत्र अध्यक्षांना सुपूर्द केले, ज्याला लोकसभा अध्यक्षांनी तत्काळ मंजुरीही दिली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार आवश्यक असलेली दोन-तृतीयांश (2/3) संख्या गाठल्यामुळे या खासदारांवर कोणतीही अपात्रतेची कारवाई होणार नाही. हा गट लवकरच अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) विलीन होणार आहे.
राऊतांच्या मांडीला मांडी लावून बसलेला 'सातवा' खासदार कोण?
या संपूर्ण नाट्यमय घडामोडीत आता एक नवीन आणि अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. 6 खासदार फुटल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांच्या शेजारी बसलेल्या नेत्यांपैकीच आणखी एक खासदार लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे हा 'सातवा' खासदार नेमका कोण, यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दोन महिन्यांत होणार अंतिम फैसला
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, संजय राऊत यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेला खासदार राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला हजर असलेला एक नेता गेल्या 3 महिन्यांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश करण्यास तयार झाला होता. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यावेळी 'ऑपरेशन टायगर'ची अंमलबजावणी लांबणीवर पडली. या ताज्या घडामोडींच्या वेळी ऐनवेळेस या खासदाराने नकार दिला असला, तरी येत्या 2 महिन्यांत हा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करेल, असा दावा शिंदे गटातील वरिष्ठ सूत्रांनी केला आहे.
सावंत की देसाई? ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर डोळा
सुरुवातीला हा सातवा बंडखोर खासदार नाशिकचे राजाभाऊ वाजे असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाजे हे निष्ठावंत असून ते फुटणार नाहीत. त्यामुळे आता संशयाची सुई अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्याकडे फिरली आहे. सावंत आणि देसाई हे दोघेही उद्धव ठाकरे यांचे अत्यंत अत्यंत विश्वासू आणि दिल्लीतील पक्षाचे प्रमुख चेहरे मानले जातात. या दोघांपैकी कोणीही एक जरी नेता शिंदे गटात गेला, तरी तो उद्धव ठाकरेंसाठी वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर सर्वात मोठा धक्का ठरेल.
संसदेतील सध्याचे पक्षीय चित्र
पक्षातील या मोठ्या भूकंपानंतर ठाकरे गटाकडे उरलेले आणि बंडखोरी केलेले खासदार खालीलप्रमाणे आहेत:
शिंदे गटात सामील झालेले 6 बंडखोर खासदार:
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
सध्या ठाकरे गटात शिल्लक असलेले 3 खासदार
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. राजाभाऊ वाजे