Silver Price Forecast: यंदाचं वर्ष 2026 हे मौल्यवान धातूंच्या बाजारासाठी अत्यंत चढ-उतारांचे ठरत आहे. वर्षाच्या सुरुवातीला ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली होती. जानेवारीच्या अखेरीस चांदी प्रति औंस 121.64 डॉलर्सवर पोहोचली होती, तिथून त्यात सुमारे 43 टक्क्यांची घसरण झाली. मात्र, शुक्रवार, 12 जून 2026 रोजी बाजारपेठेत पुन्हा सकारात्मक बदल दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 0.63 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 67 डॉलर्सवर पोहोचला. तर भारतातील 'MCX' (कमोडिटी एक्सचेंज) वर चांदीचे फ्युचर्स दर 2.9 टक्क्यांच्या वाढीसह प्रति किलो 2,46,604 रुपयांवर बंद झाले. सलग पाच आठवड्यांच्या घसरणीनंतर आलेली ही तेजी गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक मानली जात आहे.
जागतिक वित्तीय संस्थांकडून चांदीसाठी मोठे उद्दिष्ट
भविष्यात चांदीचे दर पुन्हा एकदा मोठी झेप घेऊ शकतात, असा विश्वास जागतिक बाजारपेठेतील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 'रॉयटर्स'च्या सर्वेक्षणातील विश्लेषकांनी चांदीसाठी प्रति औंस 79.50 डॉलर्सचे सरासरी लक्ष्य निश्चित केले आहे. तर दुसरीकडे, 'कॉमर्झबँक'ने (Commerzbank) चांदी थेट प्रति औंस 90 डॉलर्सपर्यंत मजल मारेल, असा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय 'जेपी मॉर्गन'ने (JPMorgan) या वर्षाच्या अखेरीस 85 डॉलर्स आणि 'बँक ऑफ अमेरिका'ने (Bank of America) 86 डॉलर्स प्रति औंसचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे येत्या काळात चांदीमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे.
औद्योगिक मागणीत वाढ आणि पुरवठ्याची टंचाई हेच मुख्य कारण
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमती वाढण्यामागे तिचा प्रचंड औद्योगिक वापर हे सर्वात मोठे कारण आहे. जगभरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सौर पॅनेल (Solar Panels) आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसाठी चांदीची मागणी वेगाने वाढत आहे. मात्र, या मागणीच्या तुलनेत जागतिक स्तरावर चांदीचा पुरवठा अत्यंत मर्यादित आहे. अंदाजानुसार, वर्ष 2026 मध्ये चांदीचा पुरवठा मागणीपेक्षा सुमारे 67 दशलक्ष औंसने कमी पडू शकतो आणि पुरवठा तुटवड्याचे हे सलग 6 वे वर्ष असेल. मागणी आणि पुरवठ्यातील या मोठ्या असंतुलनामुळेच आगामी काळात चांदीच्या दरात अनपेक्षित वाढ होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.