Supriya Sule: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होणार असल्याच्या वावड्या उठल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. शरद पवारांच्या संभाव्य राजकीय हालचालींमुळे विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. या कथित सत्तापालटानंतर शरद पवार गटाला केंद्रात महत्त्वाचे अर्थमंत्रिपद दिले जाईल, अशा चर्चांना उधाण आले होते. त्यातच सत्ताधारी नेत्यांच्या बैठकांमुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले. मात्र, या सर्व घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर देत पडदा टाकला आहे.
'ऑन कॅमेरा' बोलणार तेच अंतिम; सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या या केवळ सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किंवा कोणत्याही अधिकृत प्रवक्त्याने याविषयी कोणतेही विधान केलेले नाही. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, म्हणूनच आपण स्वतः समोर येऊन ही वस्तुस्थिती मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. पडद्यामागील चर्चा किंवा सूत्रांच्या माहितीला कोणताही आधार नसून, आपण कॅमेऱ्यासमोर दिलेली प्रतिक्रिया हेच एकमेव सत्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
एकनाथ शिंदेंची भेट सदिच्छा भेट; मंत्रिपद आणि प्रस्तावांचे दावे फेटाळले
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, एनडीएकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही सध्या आहोत त्याच भूमिकेवर ठाम राहून विरोधी पक्षात काम करत आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शरद पवार गेल्याच्या घटनेला वेगळा रंग दिला जात असल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला. शरद पवारांना शारीरिक त्रासामुळे जास्त चालणे शक्य नसल्याने ते तेथे थांबले होते, असा खुलासा त्यांनी केला. ही निव्वळ एक सदिच्छा भेट होती, असे सांगत त्यांनी सरकारमधील सहभागाचे सर्व दावे खोडून काढले.