Prajakt Tanpure: अजित पवार यांच्या निधनानंतर आज बारामतीसह राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीतून अनपेक्षितपणे माघार घेतल्यामुळे चर्चेत आलेले शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत अखेर मौन सोडले आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचाच निष्ठावान कार्यकर्ता असून भाजप प्रवेशाच्या सर्व चर्चा निव्वळ अफवा आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
निवडणुकीतून माघार आणि तटस्थ भूमिकेचे कारण
राहुरीच्या रिंगणातून माघार घेतल्यापासून तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तसेच, त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न केल्यामुळे संभ्रम वाढला होता. यावर स्पष्टीकरण देताना तनपुरे म्हणाले की, “ही पोटनिवडणूक राज्याच्या सत्तेचे समीकरण बदलणारी नसून स्थानिक प्रश्नांवर मर्यादित आहे. त्यामुळे मी माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नाही, याचा अर्थ मी पक्ष सोडला असा होत नाही.”
‘ईडी’ची कारवाई आणि क्लीन चिटचा योगायोग
साखर कारखाना व्यवहारातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून त्यांना मिळालेल्या दिलाशामुळेही चर्चांना उधाण आले होते. त्यावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘आर्थिक गुन्हे शाखेने वर्षभरापूर्वीच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता आणि तीन महिन्यांपूर्वी न्यायालयाने तो स्वीकारला होता. काल आलेला निकाल आणि आजची निवडणूक हा केवळ एक योगायोग आहे. याचा आणि माझ्या राजकीय निर्णयाचा कोणताही संबंध नाही.’
कार्यकर्त्यांना दिले स्वातंत्र्य
स्थानिक पातळीवर कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, याचे स्वातंत्र्य आपण कार्यकर्त्यांना दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. “कार्यकर्त्यांनी गावागावांतील प्रश्नांनुसार निर्णय घ्यावा असे मी सांगितले आहे. मी आजही आणि भविष्यातही आदरणीय शरद पवार साहेबांच्याच विचारांसोबत राहणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.