Cabinet Reshuffle 2026: देशाच्या राजकीय पटलावर गेल्या काही महिन्यांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. अनेक पक्षांमधील नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे केली असून, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दिल्लीतील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुका जिंकण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून वेगवेगळ्या राज्यातील मातब्बर नेत्यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, अशी चिन्हे आहेत.
उद्धव ठाकरेंबरोबर गेलेल्या खासदाराला मिळणार केंद्रीय मंत्रिपद?
नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) गटातील 6 खासदारांनी महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. या बंडखोरीनंतर आगामी विस्तारात या 6 खासदारांपैकी एकाची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. याच राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आगामी मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत एक अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रातील 'त्या' नेत्याकडे सोपवली जाऊ शकते देशाची तिजोरी
केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलांवर भाष्य करताना आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील भाजपच्या एका अत्यंत बड्या नेत्याला केंद्रात महत्त्वाच्या अशा अर्थ मंत्रालयाची (Finance Ministry) धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, तो नेता नेमका कोण? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
पक्षांतर करणाऱ्यांना मिळणार सत्तेचे बक्षीस
रोहित पवार यांनी आपल्या दाव्याचा विस्तार करताना पुढे सांगितले की, सध्या महाराष्ट्रात एका नेत्याकडे लहान पद आहे, त्याला राज्यात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच जे 6 खासदार पक्षांतर करून आणि कथित आर्थिक तडजोडी करून सत्ताधाऱ्यांसोबत गेले, त्यातील एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाचे बक्षीस मिळण्याची दाट शक्यता आहे. रोहित पवारांच्या या थेट आरोपामुळे शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांपैकी कोणाचे नशीब उजळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ता संतुलनासाठी केंद्र सरकार नव्या चेहऱ्यांना देणार संधी
तथापि, आगामी निवडणुका आणि पक्षांतर्गत संतुलन साधण्यासाठी अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाऊ शकते. या शर्यतीत आम आदमी पार्टी (AAP) सोडणाऱ्या खासदारांपैकी एका नेत्यालाही मंत्रिपद मिळण्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्व शक्यतांवर केंद्र सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत मोहोर उमटलेली नाही. त्यामुळे आगामी काळात रोहित पवारांचे हे दावे खरे ठरतात का? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.