Uddhav Thackeray: राज्यातील निवडणुकांमधील घोळ, मतदार याद्यांमधील गैरव्यवस्था, शेतकरी पॅकेज आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावरून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, ‘सत्ताधारी पक्ष आता ‘बूथ कॅप्चरिंग’पुरते मर्यादित न राहता, संपूर्ण निवडणूकच आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रकार जनतेच्या हितासाठी नाही, तर फक्त स्वतःच्या लोकांची सत्ता टिकवण्यासाठी आहे.’
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ‘सत्ताधारी गटात मारामारी सुरू आहे. आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये असे प्रकार होतात हे ऐकत होतो. बंदुका निघत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या. आता ‘बूथ कॅप्चरींग’ ऐवजी अख्खी ‘निवडणूकच कॅप्चर’ करण्याचा उद्योग सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत जनतेला आता शिवसेना एकमेव विश्वासार्ह पर्याय वाटत आहे,’ असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
सरकार विरोधी पक्षनेतेपदाला इतके का घाबरत आहे?
दरम्यान, त्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. ‘खरं तर विरोधी पक्षनेतेपद महायुती सरकारने यापूर्वीच द्यायला हवे होते. आता एका वर्षानंतरही दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नाहीत. सरकार विरोधी पक्षनेतेपदाला इतके का घाबरत आहे? जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवत असाल, तर उपमुख्यमंत्रीपद तात्काळ रद्द केले जावे, कारण संविधानात याबाबत कोणतीही तरतूद नाही, असेही ते म्हणाले.
तथापी, उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदावरही टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री हे फक्त बिरूद म्हणून ठेवले जाऊ नये. सरकार भ्रष्टाचारात सामील असलेल्या काही व्यक्तींना संरक्षण देत असताना, विरोधी पक्षनेतेपदाची भिती का बाळगत आहे? त्वरित दोन्ही सभागृहांसाठी विरोधी पक्षनेते जाहीर करणे हेच लोकशाही जिवंत ठेवण्याचे मुख्य पाऊल असल्याचही यावेळी ठाकरे यांनी नमूद केलं. या वक्तव्याद्वारे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या अधिकारांसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.