K Annamalai: तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचा (भाजप) एक प्रमुख चेहरा असलेले के. अण्णामलाई भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चांनी सध्या चांगलाच जोर धरला आहे. या वाढत्या राजकीय चर्चांच्या गदारोळात, अण्णामलाई यांनी सोमवारी दिल्लीचा दौरा केला. दिल्ली विमानतळावर पत्रकारांनी त्यांना नवीन पक्ष स्थापनेबाबत थेट प्रश्न विचारला. यावर अत्यंत सूचक प्रतिक्रिया देताना अण्णामलाई यांनी, “कृपया थोडी वाट पहा. आपण 2 दिवसांत एकत्र बसून या विषयावर सविस्तर चर्चा करू,” असे म्हणत सस्पेन्स आणखी वाढवला आहे.
‘भाजपमध्ये काहीही शक्य’; अण्णामलाईंच्या भूमिकेवर सत्ताधारी DMK ची पहिली प्रतिक्रिया
अण्णामलाई यांच्या पक्ष स्थापनेच्या चर्चांवर तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमके (DMK) पक्षानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. डीएमके नेते टी.के.एस. इलंगोवन यावर बोलताना म्हणाले, “ते आधीच भाजपचे पदाधिकारी असताना, नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी स्वतःच्याच पक्षाची परवानगी मागत आहेत, ही बाबच मुळात विचित्र आहे. परंतु, भाजपमध्ये काहीही शक्य आहे. वैयक्तिकरित्या मला असे वाटते की अण्णामलाई राजीनामा देणार नाहीत; कारण एखादा नवीन राजकीय पक्ष चालवणे हे काही सोपे काम नाही. ते अभिनेते विजय यांच्यासारखे लोकप्रिय स्टार नाहीत. आता पुढे काय घडते, हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागेल.”
मुख्यमंत्री विजय यांचे महत्त्वपूर्ण विधान
दुसरीकडे, तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि ‘टीव्हीके’ (TVK) प्रमुख विजय यांनी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजच्या प्रांगणात आयोजित एका जाहीर सभेला संबोधित करताना राज्याच्या राजकारणावर मोठे भाष्य केले. मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट केले की, “अगदी आजही आणि मी हे पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून सांगत आहे तामिळनाडूतील खरी राजकीय लढत ही केवळ 2 पक्षांमध्येच आहे: ती म्हणजे DMK आणि TVK. या दोन प्रमुख पक्षांच्या दरम्यान इतर कोणत्याही तिसऱ्या शक्तीसाठी किंवा नेत्यासाठी राज्यात कोणतीही भूमिका किंवा जागा उपलब्ध नाही.” यावेळी त्यांनी तिरुचिरापल्ली पूर्व विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपल्या पक्षाला भरघोस जनादेश दिल्याबद्दल जाहीर आभारही मानले.
#WATCH | Tamil Nadu | BJP leader K. Annamalai leaves for Delhi from Chennai. When asked on speculations about him expected to launch a new party, he says, "Please wait. We will sit down and talk in two days" pic.twitter.com/5qOZfp7OHD — ANI (@ANI) June 1, 2026
भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची घेणार भेट
राजकीय वर्तुळातील सूत्रांच्या माहितीनुसार, अण्णामलाई यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली असून, या भेटीनंतर तामिळनाडूच्या राजकारणाला कोणती दिशा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, येत्या 4 जून रोजी अण्णामलाई यांचा वाढदिवस असून, त्यापूर्वीच तामिळनाडूतील कोईम्बतूर शहरात विविध ठिकाणी अण्णामलाई यांचे छायाचित्र असलेले मोठे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे या वाढदिवसाच्या मुहूर्तावर अण्णामलाई मोठा राजकीय धमाका करणार का, अशी शक्यता वर्तवली जात आहे.