Dhananjay Deshmukh: ‘राजकारण म्हणजे जे दिसते तसे नसते,’ याची प्रचिती मस्साजोग सरपंचपदाच्या निकालातून आली आहे. ज्या कुटुंबासाठी एकेकाळी संपूर्ण गाव आणि महाराष्ट्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला, त्याच कुटुंबाला प्रत्यक्ष मतपेटीतून गावकऱ्यांनी नाकारले. अश्विनी संतोष देशमुख यांच्या पराभवानंतर त्यांचे दीर धनंजय देशमुख यांनी या निकालाचे सखोल विश्लेषण केले आहे. संतोष अण्णांच्या हत्येनंतर गावाने दिलेली भावनिक साथ आणि प्रत्यक्ष मतदानात मिळालेली मते यात मोठी तफावत दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
न्यायाच्या लढाईत गावाची नाळ तुटली
पराभवाचे मुख्य कारण सांगताना धनंजय देशमुख भावूक झाले. त्यांनी मान्य केले की, “न्यायाच्या लढाईत आणि गुंतागुंतीच्या न्यायालयीन प्रक्रियेत आम्ही इतके अडकलो होतो की, गावच्या लोकांशी असलेली आमची नाळ कुठेतरी तुटत गेली. भाऊ गेल्यानंतर ती राजकीय पकड मला टिकवून ठेवता आली नाही.” संतोष अण्णांच्या पश्चात गावातील अनेकांना कुटुंबाकडून काही अपेक्षा होत्या, मात्र कौटुंबिक संकट आणि परिस्थितीमुळे त्या पूर्ण करता आल्या नाहीत, हेही पराभवाचे एक मोठे कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणापलीकडचे नाते
मस्साजोगमध्ये निकालापेक्षा जास्त चर्चा रंगली ती नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख यांच्या एका भेटीची. विजयाचा जल्लोष बाजूला सारून स्वरूपानंद यांनी विजयानंतर थेट दिवंगत संतोष देशमुख यांचे निवासस्थान गाठले. तेथे त्यांनी संतोष अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. “निवडणूक ही लोकशाहीचा भाग म्हणून लढली गेली, पण अण्णांना न्याय मिळवून देण्याच्या लढाईत मी यापुढेही देशमुख कुटुंबाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शत्रुत्व विसरून विकासाचा हात; नवा पायंडा
या भेटीदरम्यान धनंजय देशमुख यांनीही मोठे मन दाखवत स्वरूपानंद यांचे स्वागत केले आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणुकीतील कटुता बाजूला ठेवून दोन्ही नेत्यांनी दाखवलेल्या या प्रगल्भतेमुळे गावात एक सकारात्मक संदेश गेला आहे. मतदारांचा कौल शिरसावंद्य मानून आता गावाच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.