Girish Mahajan: ठाकरे गटातून सातत्याने होणाऱ्या नेत्यांच्या पक्षांतरांवर बोलताना भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाजन म्हणाले, “उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात ज्याला जायचंय त्याने कधीही जावं, आम्ही कोणाला थांबवणार नाही. पण जर पक्षप्रमुखच अशी भूमिका घेत असतील, तर लोक तरी तुमच्यासोबत कशाला थांबतील? तुमची रोजची तीच ती बडबड ऐकण्यात लोकांना आता रस राहिलेला नाही. नेत्यांना थांबवून ठेवण्याची क्षमता आता तुमच्यात राहिलेली नाही, म्हणूनच तुमचे लोक तुम्हाला सोडून जात आहेत.”
अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरून महाजनांचा टोला
उद्धव ठाकरेंच्या भूतकाळातील राजकीय निर्णयांवर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, “ज्यावेळी उद्धव ठाकरे अडीच वर्षांसाठी राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच मी म्हटलं होतं की तुम्ही हे करायला नको होतं. जर तुम्हाला राजकारणात लांबची खेळी खेळायची होती, तर तुम्ही महाविकास आघाडी करून खूप मोठी चूक केली. तुम्ही केवळ थोड्या अंतराचे प्रवासी ठरलात आणि तिथेच थांबलात. शेवटी झालं काय? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत बसलात आणि त्यांचेच गुणगान गात राहिलात.”
आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची परिस्थिती आणखी वाईट होणार
महाविकास आघाडीत सामील झाल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रचंड नुकसान झाल्याचा दावा महाजन यांनी केला. “काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादात तुमची नगरपालिकेत काय अवस्था झाली आणि विधानसभेत काय परिस्थिती झाली, हे सर्वांनी पाहिले आहे. तुमची कमालीची पीछेहाट झाली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, आगामी काळात ठाकरे गटाची परिस्थिती यापेक्षाही अधिक वाईट होणार आहे. आता त्यांच्याकडे अवघ्या 17 जागा उरल्या आहेत, पण यापुढील काळात या 17 पैकी एकही जागा त्यांना निवडून आणता येणार नाही,” असे भाकीतही महाजन यांनी वर्तवले.
‘संजय राऊत म्हणजे मानवी बॉम्ब’
दरम्यान, शेवटी गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर सर्वात मोठा हल्ला चढवला. “संजय राऊत हे दुसऱ्या कोणाचे नुकसान करण्याआधी स्वतःच्याच पक्षाचे वाटोळे करत आहेत. ते एक प्रकारे ‘मानवी बॉम्ब’ आहेत, जो स्वतःच्याच माणसांना संपवतोय. म्हणूनच मी सांगतोय, उद्धवजी जर तुम्ही वेळीच राऊतांना आवरले नाही, तर आगामी काळात तुमचे काहीच अस्तित्व उरणार नाही,” असे रोखठोक मत महाजन यांनी व्यक्त केले.