Massajog Election: सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आता राजकीय रणसंग्राम रंगणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा 'ट्विस्ट' समोर आला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने आता ही पोटनिवडणूक थेट मतदानापर्यंत पोहोचली आहे.
तीन उमेदवारांची माघार, दोघांत 'कांटे की टक्कर'
सरपंच पदासाठी एकूण पाच जणांनी शड्डू ठोकला होता. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत संजिवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करूणा देशमुख यांनी आपले नामांकन मागे घेतले. मात्र, स्वरूपानंद देशमुख मैदानात कायम राहिल्याने आता दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात ही लढत होईल.
सहानुभूती विरुद्ध जुना संघर्ष
ही निवडणूक केवळ 18 महिन्यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी असली, तरी ती आता प्रतिष्ठेची बनली आहे. अश्विनी देशमुख आपल्या पतीचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि गावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्या मैदानात उतरल्या आहेत. गावात सध्या संतोष यांच्या निधनामुळे मोठे भावनिक वातावरण असून त्यांना मोठी सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. तसेच स्वरूपानंद देशमुख हे गावातील जुने जाणते राजकारणी आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी संतोष देशमुख यांना कडवी झुंज दिली होती. त्यावेळी केवळ 9 मतांच्या निसटत्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी ते हे आव्हान पूर्ण शक्तीनिशी पेलण्याच्या तयारीत आहेत.
29 एप्रिलला लागणार निकाल
दरम्यान, मस्साजोग गावातील एकूण 2284 मतदारांच्या हातात आता या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य आहे. सहानुभूतीची लाट अश्विनी देशमुखांना तारणार की स्वरूपानंद यांचा जनसंपर्क त्यांना विजय मिळवून देणार, याचा फैसला 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.