Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक नव्या राजकीय घडामोडी घडल्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील राजकारणात सुरू झालेल्या उलथापालथीने राज्यातील सत्तासमीकरणे सतत बदलत गेली. 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या फाटल्यानंतर भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील वाद अधिकच तीव्र झाला. या संघर्षात दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीत. अनेकदा वैयक्तिक टीपणीपर्यंत हा वाद वाढल्याचेही पाहायला मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदीय भाषणातील एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केले. “कोण होतास तू, काय झालास तू?” अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोमणा लगावला. तसेच अल्पसंख्यांक मतांसाठी हिंदुत्त्वाचा त्याग केल्याचा आरोप करत अप्रत्यक्ष निशाणा साधला.
दरम्यान, अमित शाह यांनी लोकसभेत भाषण करताना काँग्रेसच्या नेतृत्वावर आणि विशेषतः नेहरू, इंदिरा गांधी तसेच सोनिया गांधी यांच्या काळातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. इतिहासातील सर्वात मोठी व्होटचोरी त्या काळात झाल्याचा दावा त्यांनी केला. याच भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य करत, न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर टीका केली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखाद्या न्यायाधीशाविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जात असल्याचा उल्लेख करत, ‘मतांची गणितं जुळवण्यासाठी हा महाभियोग आणण्यात येत आहे आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली आहे,’ असेही शाह यांनी नमूद केले. या निर्णयावरून न्यायाधीशाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शाहांनी केला.
कोण होतास तू, काय झालास तू?#UddhavThackeray pic.twitter.com/ZWsT4gu1CY — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 10, 2025
हेही वाचा – Bharat Gogawale Reaction : कॅशबॉम्ब व्हिडीओवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘माझ्याकडे पैसा…’
तथापी, शाह यांच्या या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. राहुल गांधी यांनी आरोप केलेल्या मतचोरीच्या मुद्द्यावरही शाहांनी कठोर प्रतिउत्तर देत सर्व दावे फेटाळून लावले. या वक्तव्यांमुळे दिल्लीतील संसदेत गदारोळ उडाला आणि विरोधकांनी संतप्त होऊन सभात्याग केला. इलेक्टोरल रिफॉर्म्सवर झालेल्या चर्चेत शाहांनी नागरिकत्व, मतदार याद्या, VVPAT तसेच SIR या मुद्द्यांवर उदाहरणांसहित भाष्य करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.