Imtiaz Jaleel Statement: माझ्या रॅलीवर झालेला हल्ला हा निव्वळ योगायोग नसून तो सत्ताधाऱ्यांनी आखलेला कट होता. भाजप मंत्री अतुले सावे आणि संजय शिरसाट यांच्या गुंडांनी हा राडा घडवून आणला, असा गंभीर आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. बायजीपुरा भागात झालेल्या राड्यानंतर जलील यांनी प्रथमच जाहीर भूमिका मांडली.
हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण? जलील यांनी सांगितली नावे
जलील यांनी केवळ राजकीय नेत्यांवरच नाही, तर स्थानिक पातळीवर हा राडा घडवणाऱ्यांची नावेही सांगितली. काँग्रेस उमेदवार कलीम कुरेशी यांचे 'नंबर दोन'चे धंदे आहेत आणि त्यांनीच त्यांच्या साथीदारांच्या मदतीने हा हल्ला घडवला, असा दावा जलील यांनी केला. तिकीट कापल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन बाहेरून माणसे भाड्याने बोलावण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला.
गुंडगिरी करायची असेल तर आम्हीही कच्चे नाही; जलील यांचा इशारा
हल्ल्यानंतरही डगमगून न जाता जलील यांनी विरोधकांना सज्जड दम भरला आहे. त्यांना वाटलं होतं हल्ला केला की आम्ही रॅली थांबवू, पण आमचा प्रचार सुरूच राहील, असे त्यांनी ठणकावून सांगितले. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासून मुख्य सूत्रधारांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तथाप, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करतानाच त्यांनी इशारा दिला की, जर समोरून गुंडगिरी होणार असेल, तर आम्ही गप्प बसणाऱ्यांपैकी नाही.
हेही वाचा – Ganesh Naik Speech: 'चोरांची नजर नेहमी खाली असते…'; गणेश नाईक यांची एकनाथ शिंदेंवर खोचक शब्दांत टीका
राजीनाम्याची अफवा आणि तिकिटाचा वाद
दरम्यान, पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना जलील म्हणाले की, मी एका पैशाचाही व्यवहार केलेला नाही. 22 माजी नगरसेवकांची तिकिटे कापल्यामुळे जो अंतर्गत असंतोष आहे, त्याचा फायदा विरोधक उचलत असल्याचा दावा त्यांनी केला.