Ram Mandir: अयोध्येत आज ऐतिहासिक क्षण साकारला आहे. भव्य राम मंदिराच्या शिखरावर पवित्र भगवा ध्वज फडकवल्याने मंदिर बांधकाम पूर्ण झाल्याची घोषणा झाली आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेला संघर्ष, श्रद्धा आणि प्रतीक्षेचा प्रवास आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. मात्र या उत्साहात एक प्रश्न वारंवार विचारला जातो राम मंदिराचा खरा मालक कोण? आणि मंदिरासाठी मिळणारा अपार निधी कुठे वापरला जातो?
राम मंदिराचा कायदेशीर मालक कोण?
राम मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, दररोज मोठ्या प्रमाणात देणग्या मिळणारे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. मात्र या मंदिराची कायदेशीर मालकी कोणाची आहे, याबाबत अनेकांना अद्याप उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2019 मधील ऐतिहासिक निकालात, राम लल्ला विराजमान म्हणजेच भगवान रामाचे बालरूप यांना अयोध्येतील वादग्रस्त भूमीचा कायदेशीर मालक म्हणून मान्यता दिली. न्यायालयाने स्पष्ट केले की ही जमीन पूर्वीपासून राम लल्लाच्या अधिकारातील आहे. यानंतर मंदिराच्या बांधकाम, व्यवस्थापन आणि दाननिधीच्या नियोजनासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ स्थापन केले. हेच ट्रस्ट संपूर्ण मंदिर प्रकल्पाचे प्रशासन बघते.
मंदिराच्या देणग्या कुठे जमा होतात?
देशभरातील भाविक, कंपन्या आणि अनेक सामाजिक संस्थांकडून राम मंदिरासाठी सतत दान येत असते. या सर्व देणग्या थेट ट्रस्टच्या अधिकृत बँक खात्यांमध्ये जमा केल्या जातात. देणगी रोख, चेक, ऑनलाइन ट्रान्सफर अशा विविध पद्धतीने दिली जाते. मौल्यवान धातू सोने, चांदी यांच्यादेखील देणग्या मोठ्या प्रमाणात मिळतात. मंदिरात विशेष देणगी काउंटर असून तेथे पावत्या देऊन देणगीची नोंद ठेवली जाते. दानपेट्या उघडण्यापासून मोजणीपर्यंत सर्व प्रक्रिया SBI अधिकारी आणि ट्रस्ट प्रतिनिधी यांच्या देखरेखीत केली जाते.
हेही वाचा – Labour Honesty Behavior: मजूरांचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद; स्टेशनवर मिळालेली पैशांची बॅग केली परत
अब्जावधी निधीचा वापर कुठे?
मार्च 2023 पर्यंत ट्रस्टकडे 3,000 कोटींहून अधिक निधी जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यापैकी 1,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम मंदिर बांधकामावर खर्च करण्यात आली. तसेच उर्वरित निधीचा वापर मंदिर परिसराची देखभाल, सुरक्षा व्यवस्था, भाविकांच्या सुविधा, भविष्यातील विस्तार प्रकल्प, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्ये यासाठी केला जातो. ट्रस्टकडून देणगीचा प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी वापरला जात असल्याचे नियमितपणे स्पष्ट केले जाते. राम लल्लाच्या नावाने उभारलेल्या या मंदिरात येणारे सर्व पैसे नियमपूर्वक ट्रस्टच्याच ताब्यात असतात आणि तेच पैसे मंदिराच्या विकासासाठी ते निधी वापरतात. तथापी, अयोध्येच्या इतिहासात आजचा दिवस नव्या युगाची सुरुवात मानला जात आहे.