Modi Takes Bless Of Makhanlal Sarkar: पश्चिम बंगालमधील भाजपच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात एका भावनिक प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर पोहोचताच एका वयोवृद्ध व्यक्तीच्या पाया पडून त्यांना प्रेमाने मिठी मारली. या व्यक्तीचे नाव माखनलाल सरकार असून, त्यांच्या या सन्मानानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
कोण आहेत माखनलाल सरकार?
माखनलाल सरकार हे पश्चिम बंगालमधील भाजपचे केवळ एक ज्येष्ठ कार्यकर्ते नसून, ते पक्षाच्या संघर्षाचा जिवंत इतिहास मानले जातात. 92 वर्षांचे असूनही ते आजही पक्षकार्यात तितक्याच उत्साहाने सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची मुहूर्तमेढ भारतीय जनसंघाच्या काळापासून रोवली होती.
श्यामाप्रसाद मुखर्जींचे निकटवर्तीय
भाजपचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या मोजक्या जिवंत कार्यकर्त्यांपैकी ते एक आहेत. 1953 मध्ये ‘एक विधान, एक निशान, एक प्रधान’ या घोषणेसह डॉ. मुखर्जी यांनी काश्मीरसाठी आंदोलन पुकारले होते. या ऐतिहासिक आंदोलनात माखनलाल सरकार तरुण फळीचे नेतृत्व करत होते.
#WATCH | Kolkata | PM Modi felicitates and takes blessings of Makhanlal Sarkar, one of the most senior workers of the BJP in West Bengal. In 1952, Makhanlal Sarkar was arrested in Kashmir while accompanying Syama Prasad Mukherjee during the movement to hoist the Indian… pic.twitter.com/gpmLISKYZ5 — ANI (@ANI) May 9, 2026
मोदींनी सन्मान का केला?
पंतप्रधानांनी त्यांना दिलेली मिठी आणि केलेला नमस्कार हा त्यांच्या निष्ठेचा गौरव होता. जम्मू-काश्मीरमध्ये विनापरवाना प्रवेश करण्याच्या आंदोलनादरम्यान, पंजाब-जम्मू सीमेवर (माधोपूर) डॉ. मुखर्जी यांच्यासोबत माखनलाल सरकार यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनी या कारणासाठी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानातून भाजपची विचारधारा आकाराला आली, त्यांच्याच सहकाऱ्याला आज बंगालमध्ये सत्ता आल्यावर सन्मानित करणे हा पंतप्रधानांसाठी एक कृतज्ञतेचा क्षण होता.
हेही वाचा – PM Modi & Shinde Viral Video : बंगालमध्ये शपथविधीनंतर मोदींची शिंदेंच्या पाठीवर थाप
सोहळ्यातील ‘तो’ भावनिक क्षण
दरम्यान, ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा सुरू होण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी शिष्टाचार बाजूला ठेवून सर्वात आधी माखनलाल सरकार यांचा सत्कार केला. तसेच वाकून आशीर्वाद घेतले. वयाची नव्वदी पार केलेला हा निष्ठावंत कार्यकर्ता आणि देशाचे पंतप्रधान यांच्यातील हा दुवा भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन होणे, हे माखनलाल सरकार यांच्यासारख्या हजारो निष्ठावंतांच्या तपस्येचे फळ असल्याचेच या कृतीतून अधोरेखित झाले.