White House Statement : ‘ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव कचरापेटीत टाकला’; व्हाईट हाऊसने हे काय सांगितलं? मध्यपूर्वेतील शांतता आता दूरच

इराणच्या अवास्तव मागण्यांना अमेरिका कधीही कराराचे स्वरूप देणार नाही, अशी ग्वाही व्हाईट हाऊसने देशवासियांना दिली आहे. यामुळे मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित होणे दूर राहते की काय, असे चित्र आहे.

White House Statement : ‘ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव कचरापेटीत टाकला’; व्हाईट हाऊसने हे काय सांगितलं? मध्यपूर्वेतील शांतता आता दूरच

White House Statement over Iran Peace Deal : इराणसोबतच्या संभाव्य युद्धविरामावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या स्वतःच्या देशातच मोठ्या राजकीय संकटात सापडले आहेत. इराणने मांडलेला 10 कलमी प्रस्ताव स्वीकारणे म्हणजे अमेरिकेने मान्य केलेली शरणागती आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसने आता बचावात्मक पवित्रा घेतला असून, इराणच्या मागण्यांची यादी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अक्षरशः कचरापेटीत फेकून दिली होती, असा दावा केला आहे. इराणने दिलेला सुरुवातीचा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नव्हता, असे स्पष्ट करत प्रशासनाने ट्रम्प यांची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

'तो' प्रस्ताव गांभीर्याने घेण्यासारखा नव्हताच!
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, इराणने दिलेला मूळ प्रस्ताव अत्यंत अव्यवहार्य आणि गंभीर नव्हता. "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या वाटाघाटी करणाऱ्या टीमने त्या प्रस्तावाला कचरापेटीची वाट दाखवली होती," असे विधान त्यांनी केले. इराणच्या अवास्तव मागण्यांना अमेरिका कधीही कराराचे स्वरूप देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी देशवासियांना दिली. केवळ अमेरिकन जनतेच्या हिताचा विचार करूनच भविष्यातील कोणताही निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

अंतर्गत विरोध आणि मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, अमेरिकेचे सिनेटर ख्रिस मर्फी यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ट्रम्प यांनी इराणसमोर गुडघे टेकले असल्याचा आरोप मर्फी यांनी केला. त्यांनी ट्रम्पना 'मानसिकदृष्ट्या अनफिट' आणि राष्ट्राध्यक्ष पदासाठी अयोग्य ठरवले आहे. ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. इराणच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास संमती देणे हाच अमेरिकेचा अपमान असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. या अंतर्गत दबावामुळेच व्हाईट हाऊसवर आता स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा – Israel on Ceasefire : 'इराणसोबत शस्त्रसंधी करताना आम्हाला साधं विचारलंही नाही'; इस्रायल अमेरिकेवर संतापला, नेतान्याहूंचा युद्धाचा निर्धार कायम

होर्मुझची कोंडी आणि इराणचा अल्टिमेटम
युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच लेबनॉनवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. इराणने काही तासांपूर्वी खुली केलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'अमेरिकेला आता दोन पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागेल, एक तर शांतता किंवा इस्रायलच्या माध्यमातून युद्ध,' अशा शब्दांत इराणने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा चिंतेचे वातावरण आहे.

वस्तुस्थिती नाकारू नका – व्हाईट हाऊस
कॅरोलिन लेविट यांनी प्रसारमाध्यमांना विनंती केली आहे की, केवळ अफवांवर आधारित बातम्या पसरवू नका. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास प्राथमिक मान्यता दिली आहे, हाच चर्चेचा खरा आधार आहे. इराणच्या 'विश लिस्ट'ला ट्रम्प कधीही मान्यता देणार नाहीत, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले. अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य आणि प्रतिष्ठा अबाधित राहील, अशाच पद्धतीने इराणशी वाटाघाटी केल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

भविष्यातील पेच कायम
इराण आणि इस्रायल या दोन टोकाच्या भूमिकांमध्ये अमेरिका सध्या अडकली आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी युद्ध सुरूच ठेवण्याचे संकेत दिले असताना, ट्रम्प यांना इराणशी यशस्वी करार करणे कठीण जात आहे. आगामी 2 आठवड्यांचा हा शस्त्रसंधीचा काळ केवळ राजकीय डावपेचांचा ठरणार की खरोखर शांतता प्रस्थापित होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. आता मध्यमपूर्वेतील शांतता दूरच राहते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कसोटी मानली जात आहे.

हेही वाचा – US-Iran War : 'आम्ही पाकिस्तानला विश्वासार्ह मध्यस्थ मानत नाहीत…'; इस्रायलने काढली पाकिस्ताची इज्जत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number