Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही केवळ निवडणूक घोषणा नसून ती निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याच्या आश्वासनावरही त्यांनी भाष्य करून विरोधकांची बोलती बंद केली.
'लाडकी बहीण' आणि बळीराजासाठी सरकार कटिबद्ध
योजनेच्या भविष्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, "ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. विरोधक विचारतात की 2100 रुपये कधी देणार? तर आम्ही योग्य वेळ आल्यावर ते नक्कीच देऊ. आम्ही केवळ पोकळ घोषणा करत नाही, तर त्या कृतीत उतरवून दाखवतो." महायुती सरकार हे महिला आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांची आर्थिक उन्नती हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.
1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
अर्थसंकल्पाचे कौतुक करताना उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक अभ्यासाची स्तुती केली. ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी अत्यंत अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांचे अर्थशास्त्रावरील पुस्तक मी वाचले असून, या बजेटमधून महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे होणारी वाटचाल स्पष्ट दिसत आहे." राज्यात सध्या 8 ते 10 लाख कोटींची विकासकामे प्रगतीपथावर असून समृद्धी महामार्गाचा विस्तार, मेट्रोचे जाळे आणि वाढवण बंदरासारख्या पायाभूत सुविधांवर सरकार विशेष भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जमाफी आणि आरोग्य सुविधांचे नवे पर्व
शेतकरी कर्जमाफीबाबत विचारलेल्या प्रश्नावर शिंदे यांनी स्पष्ट केले की, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' कर्जमाफी योजनेची घोषणा ही विरोधकांना दिलेले चोख उत्तर आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेले 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर मदतीचे आश्वासनही सरकारने पूर्ण केले आहे. तसेच, 'आरोग्य आपल्या दारी' ही नवीन योजना लवकरच अमलात आणली जाईल आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.