Yunus Shaikh: ठाणे महापालिकेच्या एमआयएम (AIMIM) पक्षाच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी समोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या कुटुंबाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून, राजकीय पदाला थेट आव्हान देता येत नसल्याने खालच्या स्तरावर जाऊन वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर हल्ला करण्याची रणनीती विरोधकांनी आखली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
15 वर्षांपूर्वीचे प्रमाणपत्र बनावट कसे?
युनूस शेख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, ज्या प्रमाणपत्राला “बनावट” म्हटले जात आहे, ते प्रत्यक्षात ठाणे तहसीलदारांनी 27 एप्रिल 2011 रोजी अधिकृतपणे जारी केले होते. या पंधरा वर्षे जुन्या प्रमाणपत्रावर तहसीलदारांची अधिकृत स्वाक्षरी आहे. “माझे प्रमाणपत्र खोटे नाही, तरीही जावेद सिद्दीकी यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर जाणीवपूर्वक आरोप केले आहेत. या प्रमाणपत्राच्या आधारेच माझ्या मुलाला आणि मुलीला कायदेशीर पडताळणीनंतर जात प्रमाणपत्रे मिळाली आहेत,” असे शेख यांनी यावेळी नमूद केले.
प्रशासकीय प्रक्रियेवर आणि तहसीलदारांवर गंभीर प्रश्नचिन्ह
सुनावणीच्या प्रक्रियेवर ताशेरे ओढताना युनूस शेख म्हणाले की, ही संपूर्ण कार्यवाही अत्यंत घाईगडबडीत आणि चुकीच्या पद्धतीने पार पाडली गेली. सुरुवातीला सुनावणीसाठी 25 तारखेची वेळ देण्यात आली होती, मात्र अचानक रात्री पत्र पाठवून ती 18 तारखेवर आणण्यात आली. विशेष म्हणजे, 23 मार्च रोजी झालेल्या सुनावणीला खुद्द तहसीलदार उपस्थित नव्हते, तर अधिकार नसलेल्या नायब तहसीलदारांनी केवळ तोंडी सूचनेवरून सुनावणी घेतली. अशा त्रुटी असतानाही अवघ्या काही दिवसांत आमच्या विरोधात 8 ते 10 पानांचा अहवाल तयार करण्यात आला, हे संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.
समिती आणि अधिकाऱ्यांना चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न
“मी 2018 मध्ये मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व कागदपत्रे सादर केली होती. दोन उपविभागीय अधिकारी (SDO) आणि संपूर्ण जात पडताळणी समितीने कसून चौकशी केल्यानंतरच आम्हाला वैध प्रमाणपत्रे दिली आहेत. आता उमेश पाटील हे या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि समितीलाच चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत का?” असा सवाल शेख यांनी विचारला. माहिती अधिकारांतर्गत (RTI) वडिलांच्या शाळेतील नोंदी सादर करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणातील तक्रारदारामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा उलगडा लवकरच होईल, असेही त्यांनी संकेत दिले.