Veer Savarkar Controversy: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. 'सावरकरांचा विरोध आम्हाला कधीही मान्य होणार नाही,' अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली आहे. त्यामुळे सावरकरांच्या विचारांवरून भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
वादाची ठिणगी कशी पडली?
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी 70 हजार कोटींच्या आरोपांचा संदर्भ देत भाजपसोबत सत्तेत असण्याबाबत भाष्य केले होते. त्याला उत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी सावरकरी विचारांचा मुद्दा उपस्थित केला. 'आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार स्वीकारावेच लागतील. तुम्ही सोबत आलात तर तुमच्यासह, न आल्यास तुमच्याशिवाय आम्ही आमचे काम करू, असा इशारा शेलार यांनी दिला होता.
संविधान विरुद्ध विचारसरणी
आशिष शेलार यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "भारत देश संविधानावर चालतो, त्यामुळे कोणीही कोणावर सक्तीने विचार लादू शकत नाही," असे म्हणत त्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. या वादात आता देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेत भाजपची भूमिका क्लिअर केली आहे.देवेंद्र फडणवीसांचा
एका वाक्यात सांगितली भूमिका
या वादावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, "वीर सावरकरांच्या विचारांना अजित पवारांनी कधी विरोध केला आहे असे मला वाटत नाही. मात्र, आमची भूमिका अत्यंत ठाम आहे. सावरकरांचा अपमान किंवा विरोध आम्हाला कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही." फडणवीसांच्या या विधानामुळे महायुतीत वैचारिक मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवारांची 'सावध' खेळी
दुसरीकडे, या वादावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार यांनी विषयाला बगल देणे पसंत केले. "मला केवळ विकास आणि महानगरपालिका निवडणुकीबद्दल प्रश्न विचारा. आमच्यात अंतर कसे वाढेल, असे प्रश्न विचारू नका. निवडणुकीनंतर मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन," असे म्हणत त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर थेट भाष्य करणे टाळले.