Mumbai Water Crisis: मुंबईकरांसमोर यंदा पुन्हा एकदा पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. मुंबई महानगरपालिकेकडून 15 मेपासून लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात अद्याप सुरू असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठा झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी 28 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा आता थेट 19.22 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यापर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे पालिकेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
सात तलावांतील पाणीसाठ्यात मोठी घट; कपातीमुळे जुलैपर्यंतचा दिलासा
दरम्यान, मुंबई आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांची एकत्रित साठवण क्षमता 1,447,363 दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, सध्या या धरणांमध्ये अवघा 278,199 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा उपलब्ध साठा काटकसरीने वापरण्यासाठी पालिकेने आधीच कपातीचा निर्णय घेतला होता. मुंबईला दररोज 3950 ते 4100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, मात्र कपातीनंतर ही मात्रा 3600 ते 3750 दशलक्ष लिटरपर्यंत खाली आणण्यात आली आहे. पालिकेच्या मते, ही कपात लागू केली नसती तर सध्याचा साठा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात आला असता.
'अल निनो'चा प्रभाव आणि पालिकेचे 17 ऑगस्टपर्यंतचे नियोजन
यंदा 'अल निनो'च्या परिणामामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर पाण्याचा साठा दीर्घकाळ टिकवण्यासाठी पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून ही कपात लागू केली आहे. उपलब्ध पाणी 17 ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून, संभाव्य टंचाई टाळण्यासाठी नगरविकास विभागाकडे वैतरणा आणि भातसा नदी परिसरातून अतिरिक्त 237 दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाची स्थिती किंचित चांगली
दुसऱ्या बाजूला, मागील 2 वर्षांच्या तुलनेत यंदाची परिस्थिती काहीशी दिलासादायक असल्याचे समोर आले आहे. 22 मे 2025 रोजी धरणांतील पाणीसाठा 16.88 टक्के इतका होता, तर 2024 मध्ये मेअखेरीस हा साठा केवळ 10.67 टक्क्यांवर पोहोचला होता. त्या तुलनेत सध्याची 19.22 टक्के स्थिती किंचित चांगली असली, तरी पावसाने दडी मारल्यास किंवा उशीर केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
10 जून रोजी मान्सून धडकण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा 10 जूनदरम्यान मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मात्र पावसाने 25 मे रोजीच हजेरी लावली होती. मुंबईला प्रामुख्याने भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, विहार आणि तुळशी या 7 तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे आता मुंबईकरांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहेत.