Sanjay Raut : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवार यांना विशेष न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर राजकीय वातावरणात ठिणगी पडली आहे. ईडीनेही या प्रकरणाची फाईल बंद केल्यामुळे रोहित पवारांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यामागे मोठे राजकीय गणित असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना वाचवण्यासाठीच रोहित पवारांना ही क्लीनचिट देण्यात आल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.
नेमका दावा काय?
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘या घोटाळ्याच्या चौकशीत सुनेत्रा पवार यांचेही नाव होते. जर सरकारला सुनेत्रा पवारांना या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढायचे असेल, तर त्याच गुन्ह्यातील इतर आरोपींना किंवा संबंधित व्यक्तींना ते दोषी ठरवू शकत नाहीत.’ रोहित पवारांना मिळालेली ही मुक्ती म्हणजे सुनेत्रा पवारांच्या सुटकेसाठीची तांत्रिक सोय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘जर तुम्हाला एका महत्त्वाच्या व्यक्तीला (सुनेत्रा पवार) सोडवायचे असेल, तर तुम्हाला इतरांनाही क्लीनचिट द्यावीच लागेल. हा साधा सोपा विषय आहे,’ असे राऊत यांनी नमूद केले. या प्रकरणातून सुनेत्रा पवारांना मुक्त करणे हा सरकारचा मुख्य हेतू होता आणि म्हणूनच रोहित पवारांनाही याचा फायदा मिळाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकाला क्लीनचिट मिळाल्याशिवाय दुसऱ्याचा मार्ग मोकळा होऊ शकत नव्हता, त्यामुळेच यंत्रणांनी ही फाईल बंद केल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणातील राऊतांच्या विधानामुळे आता सत्ताधारी महायुती आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार गट काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बारामतीची निवडणूक ही केवळ चुरस नसून भावनांची लढाई
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही संजय राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. “बारामतीची ही निवडणूक अत्यंत भावनाशील आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे,” असे सांगत त्यांनी या लढतीचे महत्त्व अधोरेखित केले. महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असून, शेवटच्या सांगता सभेला सर्व दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावून ताकद दाखवून दिली आहे. शरद पवार यांनीही स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून बारामतीकरांना भावनिक आवाहन केले असून, ही निवडणूक पवारांविषयीच्या भावना व्यक्त करणारी ठरेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.
लोकशाही आणि संविधानाची प्रतिष्ठा पणाला; राऊतांचा केंद्रावर प्रहार
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमधील निवडणुकांकडेही राऊतांनी लक्ष वेधले आहे. “या निवडणुकांमध्ये देशाचे संविधान आणि लोकशाहीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे,” असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मंत्र्यांनी निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाचा वापर करून ज्या पद्धतीने बेबंदशाही चालवली आहे, त्याचा राऊतांनी तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
ममता बॅनर्जींची कोंडी करण्याचा प्रयत्न; बंगालमध्ये सत्तावापसीचा विश्वास
पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पाठराखण केली आहे. केंद्र सरकारने सर्व यंत्रणा हाताशी धरून ममता दीदींची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे, मात्र बंगालची जनता याला चोख प्रत्युत्तर देईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. कितीही दडपशाही केली तरी ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चांगल्या बहुमताने सत्तेवर येतील आणि लोकशाहीचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपच्या रणनीतीवर सडकून टीका केली.