VIT Bhopal Student Protests : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सीहोर जिल्ह्यातील व्हीआयटी (VIT) भोपाळ विद्यापीठात मंगळवारी, 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वसतिगृहातील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल संतप्त झालेल्या तब्बल 4 हजार विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलन केले. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अनेक गाड्या पेटवल्या आणि थेट कुलगुरूंच्या बंगल्याची तोडफोड केली.
विद्यार्थ्यांना कावीळीची लागण (Jaundice Outbreak)
या हिंसक आंदोलनाचे कारण धक्कादायक आहे. विद्यापीठाच्या एका वसतिगृहातील 24 विद्यार्थ्यांना कावीळ (Jaundice) झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. वसतिगृहात मिळणाऱ्या निकृष्ट जेवणामुळेच विद्यार्थी आजारी पडत असल्याचा दावा आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री इंदूर-भोपाळ महामार्गाजवळील कोठरी येथील विद्यापीठाच्या आवारात गोंधळ घातला.
या संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या बस, कार आणि दुचाकींसह रुग्णवाहिका व इतर खासगी वाहनांचीही तोडफोड केली आणि काही वाहने पेटवून दिली. जाळपोळीमुळे सुमारे दीड किलोमीटर दूरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.
तोडफोड आणि वाहने पेटवली
या घटनेची माहिती मिळताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) कार्यकर्तेही विद्यापीठाच्या परिसरात पोहोचले. दुसरीकडे, तोडफोड आणि वाहने पेटवल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे आसपासच्या 5 पोलीस ठाण्यांमधील पोलिसांच्या तुकड्या (Police Force) तातडीने घटनास्थळी पाठवाव्या लागल्या.
पोलीस अधीक्षक दीपक कुमार शुक्ला यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. “विद्यापीठाच्या आवारातील गोंधळाची माहिती मिळाल्यावर पोलिसांचे पथक तात्काळ दाखल झाले. विद्यार्थ्यांनी जेवणाच्या दर्जाबद्दल आणि अनेक विद्यार्थी आजारी पडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना समजावून परिस्थिती शांत केली. आता विद्यापीठाच्या आवारात शांतता आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, आता अन्न व औषध प्रशासन (FDA) वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या जेवणाचे नमुने तपासणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना 5 दिवसांची सुट्टी दिली आहे. या गोंधळानंतर अनेक विद्यार्थी बॅगा भरून आपापल्या घरी परतत आहेत. दरम्यान, व्हीआयटी विद्यापीठ प्रशासनाने या घटनेबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.