FASTag Fraud: जर तुम्ही तुमच्या कारसाठी FASTag वार्षिक पास खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची एक नवीन पद्धत शोधून काढली असून, बनावट FASTag पासच्या नावाखाली वाहनधारकांना हजारो रुपयांचा गंडा घातला जात आहे. या वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक अधिकृत इशारा जारी केला असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
3,000 रुपयांचे होऊ शकते नुकसान
सायबर भामटे विविध बनावट वेबसाईट आणि सोशल मीडियावरील अनधिकृत लिंक्सद्वारे एक वर्षाच्या वैधतेसह FASTag वार्षिक पास विकण्याचा खोटा दावा करत आहेत. अनेक वाहनधारक या स्वस्त आणि सोयीस्कर वाटणाऱ्या ऑफरला बळी पडत आहेत. मात्र, अशा फसव्या लिंक्सवर क्लिक केल्यास किंवा व्यवहार केल्यास वाहनधारकांना 3,000 पर्यंतचे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. इतकेच नाही तर तुमची वैयक्तिक माहिती आणि वाहनाचा तपशील देखील धोक्यात येऊ शकतो.
Attention National Highway users!#NHAI cautions National Highway users against fake websites and unauthorized links claiming to sell FASTag Annual Passes. Please note that the FASTag Annual Pass can be purchased only through the official Rajmargyatra App. Any other website or… pic.twitter.com/C6zC9Q84D0 — NHAI (@NHAI_Official) January 5, 2026
केवळ ‘राजमार्गयात्रा’ अॅपवरच अधिकृत पास
दरम्यान, NHAI ने स्पष्ट केले आहे की, FASTag वार्षिक पास खरेदी करण्यासाठी कोणतीही वेबसाईट किंवा इतर कोणतेही डिजिटल प्लॅटफॉर्म अधिकृत नाही. हे पास फक्त आणि फक्त ‘राजमार्गयात्रा’ (Rajmargyatra) या अधिकृत मोबाईल अॅपद्वारेच खरेदी केले जाऊ शकतात. या अॅपशिवाय इतरत्र कुठेही वार्षिक पास उपलब्ध नसल्याने, जर कोणी तुम्हाला तसा दावा करत असेल तर ती स्पष्टपणे फसवणूक आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
NHAI ने काय म्हटले?
NHAI ने ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करून राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना सतर्क केले आहे. ‘कृपया बनावट वेबसाईट आणि अनधिकृत लिंक्सपासून सावध राहा. सुरक्षित राहण्यासाठी अज्ञात लिंक्सवर क्लिक करणे टाळा, तुमच्या वाहनाचा किंवा FASTag चा तपशील अज्ञात व्यक्तींसोबत शेअर करू नका आणि व्यवहारासाठी नेहमी अधिकृत ‘राजमार्गयात्रा’ अॅपचाच वापर करा,’ असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.