Vanita Bane Heart Attack: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राजकीय नाट्य पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. कुठे बंडखोरीचे निशाण फडकावण्यात आले, तर कुठे धक्क्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली.
लेकीचे तिकीट कापल्याने आईला हृदयविकाराचा झटका
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा वनिता बने यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची मुलगी श्रद्धा बने या निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार होत्या. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याचे समजताच वनिता बने यांची प्रकृती खालावली आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने मीरा रोड येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जळगावमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून मोठा गोंधळ उडाला. प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवार तारा पटेल, संगीता पाटील आणि विठ्ठल पाटील यांनी भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार सुरेश भोळे यांना घेराव घातला. उमेदवारी न मिळाल्याने हे कार्यकर्ते भररस्त्यात हुंदके देऊन रडू लागले. युती न करता आम्हाला उमेदवारी द्या, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दमही या कार्यकर्त्यांनी सुरेश भोळे यांना भरला.
शरद पवार गटातही धुसफूस; कलाबाई शिरसाठ यांची बंडाची भाषा
याशिवाय, जळगावमधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार कलाबाई शिरसाठ यांना पक्षाने 'एबी' फॉर्म दिला नाही. याउलट ठाकरे गटाच्या चारही उमेदवारांनी अर्ज भरल्याने कलाबाईंचा संताप अनावर झाला. भरल्या डोळ्यांनी त्यांनी आता पक्षाचा विचार न करता 'अपक्ष' म्हणून मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.