US Shutdown Effect: अमेरिकन सरकारच्या निधीअभावी सुरू असलेल्या शटडाऊनचा फटका आता हवाई सेवांनाही बसू लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारी, अमेरिकेतील विविध विमान कंपन्यांनी 1000 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. सर्वाधिक अडथळा उत्तर कॅरोलिनातील शार्लोट विमानतळावर दिसून आला, जिथे शनिवारी दुपारपर्यंत तब्बल 130 उड्डाणे रद्द करण्यात आली. याशिवाय अटलांटा, शिकागो, डेन्व्हर आणि न्यू जर्सीमधील नेवार्क विमानतळांवरही अनेक उड्डाणे विस्कळीत झाली आहेत. न्यूयॉर्क परिसरातील विमानतळांवर रद्दीकरणे आणि विलंबाची कारणे रडार सेंटर आणि कंट्रोल टॉवर्समधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेतून निर्माण झाली आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने शटडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशभरातील उड्डाणांमध्ये कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.
तथापि, FAA च्या आदेशांव्यतिरिक्तही काही विमान कंपन्यांनी स्वतःहून उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रद्दीकरणांची संख्या एकूण उड्डाणांच्या तुलनेत कमी असली तरी, शटडाऊन कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या बंदचा फटका अमेरिकेच्या लष्करी तळांवरही बसू लागला आहे. युरोपमधील अमेरिकन तळांवर कार्यरत हजारो स्थानिक कर्मचाऱ्यांना गेल्या सहा आठवड्यांपासून पगार मिळालेले नाहीत. काही देशांनी जसे की इटली आणि पोर्तुगाल, या कर्मचाऱ्यांना तात्पुरते वेतन दिले आहे, परंतु नंतर अमेरिका ती रक्कम परतफेड करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, अमेरिकन सरकारच्या शटडाऊनचा परिणाम आता सरकारी कामकाजापासून ते हवाई आणि आंतरराष्ट्रीय प्रवासापर्यंत सर्व क्षेत्रांवर जाणवू लागला आहे.