Hormuz Strait Latest update: अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या होर्मुज जलडमरूमध्यवर इराणचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी 'प्रोजेक्ट फ्रीडम' हे मोठे लष्करी ऑपरेशन सुरू केले आहे. अमेरिका आणि इस्रायलमधील संघर्षानंतर इराणने हा मार्ग जवळपास बंद केला होता, जो आता पुन्हा उघडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवारी अमेरिकेने आपली दोन व्यापारी जहाजे या मार्गातून यशस्वीपणे सुरक्षित पार केल्याचा दावा केला आहे. मात्र, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने हा दावा फेटाळून लावत गेल्या काही तासांत एकही जहाज तिथून गेले नसल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचा इराणवर हल्ला
या मोहिमेदरम्यान अमेरिकन नौदलाने इराणच्या 6 ते 7 लढाऊ छोट्या नौका उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. इराणने डागलेली क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अमेरिकेने हवेतच रोखल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन ॲडमिरल ब्रॅड कूपर यांच्या मते, इराणच्या आयआरजीसी दलाने व्यापारी जहाजांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता, परंतु अमेरिकेने अचूक बचावात्मक शस्त्रास्त्रांनी हा हल्ला परतवून लावला. दरम्यान, होर्मुजमध्ये एका दक्षिण कोरियाच्या जहाजातही स्फोट झाला आहे, मात्र हे जहाज ऑपरेशनचा भाग नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
15 हजार सैनिकांचा फौजफाटा
'प्रोजेक्ट फ्रीडम' हे ऑपरेशन केवळ काही जहाजांपुरते मर्यादित नसून यात 15 हजार अमेरिकन सैनिक सहभागी झाले आहेत. या मोहिमेत अमेरिकन नौदलाची विध्वंसक (Destroyers) 100 पेक्षा जास्त विमाने आणि पाण्याखालील अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला जात आहे. कूपर यांनी इराणी सैन्याला अमेरिकन युद्धनौकांपासून दूर राहण्याचा कडक इशारा दिला आहे. घटनास्थळावरील अमेरिकन कमांडर्सना स्वतःच्या आणि व्यापारी जहाजांच्या रक्षणासाठी सर्व अधिकार देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही इराणी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देता येईल.
आता नवीन मोहीम काय?
हा मार्ग सुरक्षित करण्यासाठी अमेरिका अनेक टप्प्यांवर काम करत आहे. यात सर्वात पहिले आणि महत्त्वाचे पाऊल म्हणजे इराणने समुद्रात पेरलेल्या बारूदी सुरुंगांपासून (Mines) रस्ता मोकळा करणे हे होते. सोमवारी युएई (UAE) वर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इराण अधिकच आक्रमक झाला असून, अमेरिकेने या आक्रमकतेला पायबंद घालण्यासाठी ही मोहीम तीव्र केली आहे. अमेरिकेने सोमवारीच दोन मोठी व्यापारी जहाजे या मार्गातून नेऊन आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
संघर्षविराम आणि इराणचा नकार
जवळपास 8 एप्रिलपासून सुरू झालेला संघर्ष-विराम अद्याप लागू आहे की नाही, यावर अमेरिकन एडमिरल ब्रॅड कूपर यांनी कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी अमेरिकेचे सर्व दावे खोटे असल्याचे सांगत त्यांच्या नौका बुडाल्याचा अहवाल फेटाळून लावला आहे. दोन्ही देशांकडून परस्परविरोधी दावे केले जात असल्याने या भागात तणाव शिगेला पोहोचला असून, येत्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.