Uganda Ultimatum Turkey : युगांडाचे लष्करप्रमुख जनरल मुहूजी कैनेरुगाबा यांनी तुर्कीकडे (तुर्की या देशाकडे) अतिशय विचित्र आणि धक्कादायक मागण्या केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी तुर्कीला केवळ 30 दिवसांचा वेळ दिला असून, तसे न झाल्यास गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. यामध्ये तुर्कीशी असलेले सर्व राजनैतिक संबंध तोडणे आणि ‘तुर्की एअरलाईन्स’वर बंदी घालण्याचा समावेश आहे. युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे पुत्र असलेले कैनेरुगाबा त्यांच्या अशा वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात.
पहिली मागणी: 1 अब्ज डॉलर्सची भरपाई
जनरल मुहूजी कैनेरुगाबा यांनी केलेल्या मागण्यांपैकी पहिली मागणी ही लष्करी आर्थिक साहाय्याशी संबंधित आहे. त्यांच्या मते, सोमालियामधील दहशतवाद्यांविरुद्धच्या लढ्यात युगांडाने दीर्घकाळ लष्करी योगदान दिले आहे. या योगदानाची आणि बलिदानाची नुकसान भरपाई म्हणून तुर्कीने युगांडाला 1 अब्ज डॉलर्स रोख द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे मुत्सद्दी वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून, एका लष्करप्रमुखांनी अशा प्रकारे जाहीर मागणी करणे अनाकलनीय आणि विक्षिप्तपणाचे मानले जात आहे.
दुसरी मागणी: ‘सुंदर वधू’ आणि लग्नाचा प्रस्ताव
आर्थिक मागणीपेक्षाही त्यांच्या दुसऱ्या मागणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुर्कीने त्यांच्या देशातील ‘सर्वात सुंदर वधू’ कैनेरुगाबा यांच्यासाठी निवडावी, जिच्याशी ते विवाह करू शकतील, अशी अजब अट त्यांनी घातली आहे. ही मागणी त्यांनी गांभीर्याने केली आहे की केवळ विनोद म्हणून, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने दुसऱ्या देशातील स्त्रियांबाबत असे विधान करणे हे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे बोलले जात आहे.
This guy, Muhoozi Kainerubaga is the chief of the Ugandan ?? Army, son of the dictator Museveni an possible future leader of the country Here, he is threatening Turkiye ??, asking for 1 billion $ and the most beautiful turkish woman as a wife or he stops diplomatic relations. pic.twitter.com/xPORjQTVHm — Clément Molin (@clement_molin) April 11, 2026
हेही वाचा – Islamabad Missile Threat : मोठेपणा करायला गेला आणि तोंडावर आपटला! पाकिस्तानवर डागल्या जाणार मिसाईल्स?
जॉर्जिया मेलोनी आणि त्यांच्या बदल्यात 100 गायींचा जुना किस्सा
विचित्र मागण्या करण्याची जनरल मुहूजी यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2022 मध्ये त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. विशेष म्हणजे, या विवाहाच्या बदल्यात त्यांनी इटलीला 100 गायी देण्याची तयारी दर्शवली होती. त्यांच्या या विधानामुळे त्यावेळी युगांडाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानहानी सहन करावी लागली होती. आता पुन्हा एकदा तुर्कीबाबत त्यांनी अशाच प्रकारची विधाने केल्याने त्यांच्या मानसिक स्थितीवर आणि वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शांतता आणि राजकीय मौन
या खळबळजनक विधानानंतरही अद्याप तुर्की, सोमालिया किंवा युगांडा सरकारच्या वतीने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुहूजी यांनी ‘X’ वरून या मागण्या प्रसिद्ध केल्या आहेत. युगांडाच्या राजकारणात राष्ट्राध्यक्षांचे वारसदार म्हणून पाहिले जाणारे मुहूजी, अशा प्रकारच्या धमक्या देऊन दोन्ही देशांमधील संबंध धोक्यात आणत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या 30 दिवसांच्या अल्टिमेटमवर तुर्की काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.